नागपूर मेट्रोचं ट्रायल रन; मेट्रो निर्धारित वेळापत्रकानुसार धावणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 04:32 PM2017-09-30T16:32:08+5:302017-09-30T16:33:30+5:30
उपराजधानीत दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन पार पडली.
नागपूर - उपराजधानीत दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या 5.6 कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवी दाखवून रवाना केले.
नागपूर मेट्रो रेल्वे तिच्या निर्धारित वेळापत्रकानुसार नागपूरकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, खा. कुपाल तुमाने, खा. विकास महात्मे, खा. संजय काकडे, स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. जोगेंद्र कावडे, माजी खा. दत्ता मेघे उपस्थित होते. गोंदिया येथील महिला ड्रायव्हर सुमेधा मेश्रम यांनी मेट्रो चालविली.
माझ्या मेट्रोमुळे शहराचे चित्र बदलणार आहे. त्यामुळे जवळपास 2 हजार लोकांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरात मेट्रो रेल्वे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण 38 कि़मी. धावणार आहे. पुढे कन्हान, हिंगणा आणि बुटीबोरीर्पयत धावेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूरात अजनी येथे पॅसेंजर हब आणि खापरी येथे लॉजिस्टिक हबची निर्मिती करण्यात येणार असून काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.