Nagpur: मेट्रोची चाके पुन्हा थांबली, प्रवासी अडचणीत, बन्सीनगर स्थानकावर सिग्नलमध्ये बिघाड
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 21, 2024 10:47 PM2024-07-21T22:47:42+5:302024-07-21T22:47:59+5:30
Nagpur: जागतिक दर्जाचा गौरव मिरवणाऱ्या नागपूर मेट्रोची चाके रविवारी पुन्हा एकदा थांबली. यावेळी ओएचइऐवजी सिग्नल बिघडला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, महामेट्रो प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - जागतिक दर्जाचा गौरव मिरवणाऱ्या नागपूरमेट्रोची चाके रविवारी पुन्हा एकदा थांबली. यावेळी ओएचइऐवजी सिग्नल बिघडला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, महामेट्रो प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
माहितीनुसार, महामेट्रो सध्या ऑरेंज लाईन आणि ॲक्वा लाईनवर मेट्रो रेल्वेची सेवा देते. ॲक्वा मार्गावर लोकमान्यनगर ते प्रजापतीनगर दरम्यान मेट्रो धावते. रविवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास अचानक मेट्रो ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे मेट्रो पुढे जाणे शक्य नसल्याने बन्सीनगर मेट्रो स्थानकातच थांबविण्यात आली. या गाडीतील प्रवाशांना स्थानकावर उतरण्यास सांगण्यात आले. हे ऐकून प्रवाशांना आश्चर्य वाटले.
मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ट्रेनमधून उतरावे लागेल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. सर्व प्रवासी बन्सीनगर मेट्रो स्टेशनवर उतरले. संबंधित मेट्रो कर्मचाऱ्यांनी रेल्वेची सिग्नल यंत्रणा तपासली. अनियमितता लक्षात आल्यानंतर ही गाडी रुळावरून हटविण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर पहिल्या ट्रेनमधील प्रवाशांना मागून आलेल्या दुसऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले.
अलीकडेच ऑरेंज लाईनच्या ओव्हरहेड इक्विपमेंटमध्ये (ओएचइ) तांत्रिक बिघाड झाल्याने अप-डाऊन मार्गावरील मेट्रो सेवा सुमारे दीड तास ठप्प झाली होती. यापूर्वी उज्ज्वलनगर मेट्रो स्थानकाच्या रुळावर होर्डिंगचे कापड पडल्याने मेट्रोची चाके थांबली होती. अशा स्थितीत या घटनांमुळे नागपूर मेट्रो जागतिक दर्जाच्या असल्याच्या सर्व दाव्यांचा पदार्फाश होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
घटनेची चौकशी केली जाईल
रविवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास मेट्रो ट्रेनमध्ये सिग्नल बिघडल्याची घटना घडली. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांना अन्य गाड्यांमध्ये पाठविण्यात आले. या संपूर्ण घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.
- अखिलेश हळवे, वरिष्ठ उपमहाव्यस्थापक (जनसंपर्क अधिकारी, कॉर्पोरेट), महामेट्रो.