आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंच्या नावावर नागपूर मेट्रोची चमकोगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:20 AM2017-11-08T01:20:40+5:302017-11-08T01:21:25+5:30
आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंची पत्रकार परिषद मिहान येथील मेट्रोच्या डेपोत आयोजित केल्याचा संदेश पाठविण्यात आला. त्यानुसार सर्व पत्रकार आयोजनाच्या ठिकाणी मेट्रोच्या डेपोत पोहचले;
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंची पत्रकार परिषद मिहान येथील मेट्रोच्या डेपोत आयोजित केल्याचा संदेश पाठविण्यात आला. त्यानुसार सर्व पत्रकार आयोजनाच्या ठिकाणी मेट्रोच्या डेपोत पोहचले; मात्र मेट्रो प्रशासनाने तेथे आलेल्या बॅडमिंटनपटूंसोबत स्वत:ची छायाचित्रे काढून पत्रकारांना टाळल्याने मेट्रोची चमकोगिरी दिसून आली.
सोमवारी रात्री नागपूर मेट्रोच्या सिव्हिल लाईन्स कार्यालयातून वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनलच्या पत्रकारांना आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, किदाम्बी श्रीकांत हे खेळाडू मिहान येथील मेट्रोच्या डेपोला भेट देणार असल्याचा संदेश पाठविण्यात आला. तसेच याच ठिकाणी या दिग्गज खेळाडूंची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मेट्रो प्रशासनाने पत्रकारांना ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील सिव्हील लाईन्स येथील मेट्रो कार्यालयातून केली. मंगळवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेची वेळ संदेशात नमूद होती. विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे वृत्तांकन बाजूला सारून सर्व पत्रकार सिंधू, सायनाच्या पत्रकार परिषदेसाठी मिहान डेपोत पोहचले. तेथे गेल्यावर कळविण्यात आले की सर्व स्टार खेळाडू पत्रकार परिषदेसाठी येतील. मात्र नियोजित वेळेच्या तब्बल एक तास उशिराने नागपूर मेट्रो मिहानच्या डेपोत खेळाडू दाखल झाले. खेळाडू उतरताच मेट्रोचे महाव्यवस्थापक बृजेश दीक्षित यांचे खेळाडूंसोबत फोटो सेशन झाले अन सर्व खेळाडू वाहनात बसून स्टेडियमकडे रवाना झाले. मेट्रोमध्येही खेळाडूंच्या व्यतिरिक्त केवळ मेट्रो प्रशासनातील कुटुंबीयांचे सदस्य दिसत होते. पत्रकारांनी दीक्षित यांना पत्रकार परिषदेबद्दलची विचारणा करताच,‘आम्ही पत्रकार परिषदेचा संदेश पाठविला नाही,’ असे त्यांनी सांगितले. मात्र आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूंना विना पोलीस सुरक्षा कसे आणले आणि ‘ट्रायल रन’ घेत असलेल्या मेट्रोमध्ये आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंना कसे बसविले, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे.