नागपूर मनपातील बदल्यांची प्रक्रिया ठप्प; १५-२० वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 11:04 AM2020-11-17T11:04:43+5:302020-11-17T11:05:08+5:30
Nagpur News तुकाराम मुंढे आयुक्त असताना मनपाच्या विविध विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात बदली करण्याचे नियोजन केले होते. परंतु मुंढे यांची बदली झाल्यापासून बदल्यांची प्रक्रिया ठप्प पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुकाराम मुंढे आयुक्त असताना मनपाच्या विविध विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात बदली करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहायक या लोकांच्या बदल्या करून त्यांनी याला सुरुवात केली होती. बदल्यांसाठी विभागवार याद्या तयार करण्यात आल्या. परंतु मुंढे यांची बदली झाल्यापासून बदल्यांची प्रक्रिया ठप्प पडली आहे.
मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात मागील १५ ते २० वर्षापासून एकाच विभागात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांची यादी तयार करून मोठ्या संख्येने बदल्या केल्या जाणार होत्या. याचे नियोजनही करण्यात आले होते. यात मनपातील पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील बदल्यांना पडद्यामागे विरोध सुरू झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने ही प्रक्रिया थांबविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काम एकीकडे वेतन दुसरीकडे
वित्त विभागामध्ये ज्येष्ठ श्रेणी लिपिक या पदावर मनपातील राजस्व निरीक्षक या पदावर काम करीत आहेत. तसेच काही अधिकारी, कर्मचारी मर्जीतील विभागात काम करीत असून वेतन मात्र दुसऱ्या विभागातून घेतात. असाच प्रकार अन्य विभागात असल्याने बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याची मनपात चर्चा आहे.
महत्त्वाच्या विभागात मर्जीतील कर्मचारी
महापालिकेच्या वित्त व लेखा विभाग तसेच नगर रचना विभागात मनपातील काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी, अधिकारी मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांना धक्का लागू नये यासाठी पदाधिकारी कामाला लागल्याची चर्चा आहे.