नागपुरात मोबाईल हिसकावून धूम स्टाईल पळणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:10 AM2018-11-18T00:10:15+5:302018-11-18T00:11:06+5:30
मोबाईलवर बोलत जात असलेल्यांच्या कानाचा मोबाईल हिसकावून धूमस्टाईल पळून जाणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात गिट्टीखदान पोलिसांनी अखेर यश मिळवले. सानिध्य ऊर्फ दादू जयभारत सोमकुंवर (वय १९) असे यातील एका आरोपीचे नाव असून तो योगेश्वरनगर, दिघोरी येथे राहतो. त्याचा दुसरा साथीदार अल्पवयीन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलवर बोलत जात असलेल्यांच्या कानाचा मोबाईल हिसकावून धूमस्टाईल पळून जाणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात गिट्टीखदान पोलिसांनी अखेर यश मिळवले. सानिध्य ऊर्फ दादू जयभारत सोमकुंवर (वय १९) असे यातील एका आरोपीचे नाव असून तो योगेश्वरनगर, दिघोरी येथे राहतो. त्याचा दुसरा साथीदार अल्पवयीन आहे.
सुरेंद्रगड, गिट्टीखदानमधील रहिवासी अभिषेक संतोष मडावी (वय २४) १ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजता काम आटोपून आपल्या घरी पायी जात होते. रस्त्याने जाताना ते मोबाईलवर बोलत होते. अचानक पल्सरवर आलेल्या दोन लुटारूंनी मडावींच्या कानाला लावलेला मोबाईल हिसकावून घेतला आणि सुसाट वेगाने पळून गेले. काही क्षणासाठी काय झाले, ते मडावींना कळलेच नाही. दुचाकीस्वार आरोपींनी आपला मोबाईल हिसकावून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर दुसºया दिवशी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजिद अहमद, हवालदार मजहर खान, नायक सूरज धोटे, राजेश दुबे, रोशन नांदेकर, धर्मेंद्र मिश्रा यांनी ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरातून आरोपींच्या पल्सरचा क्रमांक तसेच मडावी यांचा मोबाईलला सुरू केल्यानंतरचा सीडीआर मिळवून आरोपींचा छडा लावला. १४ नोव्हेंबरला आरोपी सोमकुंवरला त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात सहभागी असलेल्या साथीदाराचे नाव आणि पत्ताही सांगितला. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.
विविध भागात गुन्हे
आरोपी सोमकुंवर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने अशा प्रकारे गुन्हे करून शहरात धूम मचवली होती. ते झटक्यात मोबाईल हिसकावून घ्यायचे आणि क्षणात नजरेआड व्हायचे. त्यांनी गिट्टीखदानमधील गुन्ह्यासोबत अशाच प्रकारे नंदनवनमध्ये दोन, धंतोली, सीताबर्डी, अंबाझरी आणि सक्करदरातही गुन्हे केले होते. त्यांनी त्यातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी या दोघांकडून १७ मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर असा एकूण एकूण ३ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.