जैविक आपत्ती निवारणाचे ‘नागपूर मॉडेल’ भविष्यासाठी पथदर्शी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 01:59 PM2020-04-02T13:59:42+5:302020-04-02T14:00:31+5:30
आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ‘कोरोना’च्या निमित्ताने सध्या संपूर्ण जग एका महाभयानक संकटाचा मुकाबला करत आहे. या संकटाने भारतातही प्रवेश केला आहे. राज्यातील ज्या शहरांची तुलनेने जगाशी जास्त ‘कनेक्टीव्हीटी’ आहे त्यात नागपूर आणि परिसराचा अग्रक्रमाने समावेश होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्याच्या उपराजधानीची याबाबतची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच उपाययोजना सुरू केल्याने येथील परिस्थिती अद्यापपर्यंत तरी तशी नियंत्रणात आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या नागपूरची ख्याती एक प्रमुख ‘लॉजिस्टीक हब’ अशी असल्याने येथील परिस्थिती तुलनेने जास्त आव्हानात्मक असून ती अधिक प्रभावीपणे हाताळण्याची गरज असते. त्यानुसार सध्या ती अत्यंत चोखपणे हाताळली जात आहे.
गेल्या ११ मार्चला नागपूर शहरात पहिला ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गेल्या २० दिवसात ही संख्या १६ इतकी नियंत्रणात आहे. त्यातही सुरुवातीचे दोन आठवडे अवघे चार बाधित रुग्ण होते. यशस्वी उपचारांमुळे हे चारही बाधित रुग्ण आता बरे होऊन घरी परतले आहेत.
नागपूर शहरात संशयित नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या नागरिकांच्या विलगीकरणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच देशांतर्गत प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांचे ‘स्कॅनिंग’ करून त्यांना आता आमदार निवासात स्थापित करण्यात आलेल्या केंद्रात ठेवण्यात आले आहे. सध्या ही क्षमता ४५० व्यक्तींसाठी असून शहरातील ही क्षमता १७ हजार इतकी वाढविण्याचे नियोजन कृतीच्या पातळीवर आहे.
शहरात आढळून आलेल्या ‘कोरोना’बाधितांच्या संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली. जनतेत व्यापक जनजागृती मोहीम राबवितानाच विविध माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. ‘कोरोना’चा सामूहिक संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मेयो व मेडिकल येथील वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार ‘व्हेंटिलेटर’सह सर्व आवश्यक ती सामग्री खरेदीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला. जिल्हा प्रशासनानेही ‘मायक्रो प्लॅनिंग’ करताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर जाणिवेने काम सुरू केले. महापालिका प्रशासनानेही या साऱ्या उपाययोजनांमध्ये सहयोग देताना एक चांगला आदर्श घालून दिला. महापालिका यंत्रणेने ‘कोरोना’संदर्भात केलेले कार्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी ठरावे असे आहे.
समाजातील कमकुवत घटकांना प्रशासनातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी साठेबाजी करू नये, यासाठीही जनजागृती करण्यात आली. कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात १२१ निवारागृहे सुरूकरण्यात आली आहेत. तेथे १० हजार ३३९ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी ‘लॉकडाऊन’सह इतर सर्व उपाययोजनांमध्ये प्रभावी कृती योजना करताना बजावलेली कामगिरी मोठी आहे. ‘सायबर सेल’च्या प्रयत्नांमुळे अफवांना आळा बसला आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत सजगता आणि संवेदनशीलता दाखवून गेल्या तीन आठवड्यांपासून अतिशय जबाबदारीने व नियोजनाने काम केले आहे. आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.
- हेमराज बागुल, संचालक, माहिती व जनसंपर्क, नागपूर