नागपूर ‘मॉडेल’ देशात सर्वोत्तम होणार
By admin | Published: November 1, 2016 02:25 AM2016-11-01T02:25:05+5:302016-11-01T02:25:05+5:30
राज्याच्या विकासात तंत्रज्ञानाचा मौलिक वाटा राहणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींना ‘डिजीटल’ करत
नागपूर : राज्याच्या विकासात तंत्रज्ञानाचा मौलिक वाटा राहणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींना ‘डिजीटल’ करत असतानाच नागपूरसारख्या मोठ्या शहरांनादेखील तंत्रज्ञानासोबत जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागपूरच्या विकासासाठी माहिती व तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली उभारण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाची कामाची गती व पारदर्शकता वाढेल. नागपूरचे हे ‘मॉडेल’ देशात सर्वोत्तम होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अनिल सोले, आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरात ‘मेट्रो’चे काम गतीने सुरू आहे. नागपूर विमानतळाची नवीन धावपट्टीदेखील लवकरच तयार होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी चार कंपन्यांकडून निविदा आलेल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर-मुंबई ‘कम्युनिकेशन’ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील ५२ टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. पुढील महिनाभरात उर्वरित जमिनीचेदेखील अधिग्रहण होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईप्रमाणे नागपुरातदेखील वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना ‘स्मार्ट चालान’ पाठविण्यात येत आहे. या प्रणालीला गतिमान करण्यात येणार असून नियम तोडून घरी पोहोचण्याअगोदर ‘चालान’ पोहोचले असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शंकरनगर चौक झाला ‘स्मार्ट’
४मुंबईप्रमाणेच नागपुरातदेखील महत्त्वाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ लावण्यात येणार आहेत. नागपुरातील विविध रस्त्यांनादेखील ‘स्मार्ट’ करण्यात येणार आहे. याअंतर्गतच शंकरनगर चौक ‘लाईव्ह’ झाला आहे. येथे ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले असून ‘वायफाय स्ट्रीट’वरदेखील लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.