Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान

By जितेंद्र ढवळे | Published: November 21, 2023 07:14 PM2023-11-21T19:14:01+5:302023-11-21T19:14:32+5:30

Nagpur News: मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटल्यामुळे गोंडबोरी येथील शेतकऱ्याच्या दिड एकर शेतातील हरभरा पाण्याखाली आला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना त्यात मोखाबर्डी योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा त्यांच्या जीवावर उठला आहे.

Nagpur: Mokhabardi Upsa Irrigation Scheme : Canal water in fields, loss of gram | Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान

Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान

नागपूर (भिवापूर) - मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटल्यामुळे गोंडबोरी येथील शेतकऱ्याच्या दिड एकर शेतातील हरभरा पाण्याखाली आला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना त्यात मोखाबर्डी योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा त्यांच्या जीवावर उठला आहे. ठिकठीकाणी कालव्याचे पाणी असे शेतात शिरत असल्यामुळे योजनेच्या कामावर व अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह लागले आहे.

नरहरी यादवराव माळवे रा. गोंडबोरी यांची धापर्ला शिवारात अंदाजे १६ एकर शेती आहे. यात त्यांनी हरभऱ्यासह इतर पिकांची लागवड केली आहे. मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास अचानक योजनेच्या कालव्याची पाळ फुटल्यामुळे पाणी शेतात शिरले. काही कळण्यापूर्वीच दिड एकरात अंकुरलेला हरभरा पाण्याखाली आल्याने माळवे यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्याने मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर अधिकारी मोक्कास्थळी पोहचले. यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले. शेतात साचलेले पाणी नदीपात्रात वळते करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्याला सांगितले. मात्र झालेल्या नुकसानीचे काय? यावर मात्र सबंधित विभागाने नेहमी प्रमाणे मौन धारण केलेले आहे. यापूर्वी सुध्दा रोहना, वडध, मोखाळा परिसरात कुठे कालवा तर कुठे कालव्याची नाली फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही कुठले काही योग्य पाऊल उचलतांना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यात मोखाबर्डी योजनेच्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त होत आहे.

कारण तरी काय?
गोसेखूर्द प्रकल्पावर आधारीत महत्वाकांक्षी मोखाबर्डी सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. असे असतांना योजनेअंतर्गत कालवे अशाप्रकारे अल्पावधीत फुटत असेल, तर कोट्यवधी रूपये खर्चुन निर्माण करण्यात आलेल्या योजनेचे फलीत तरी काय? हा प्रश्नच आहे. कालवा फुटण्याचे कारण काय? याबाबत विचारणा केल्यानंतर सारवासारव करण्यापलीकडे अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर सबंधीत अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठविले. शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
- प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंता
आंभोरा उपसा सिंचन विभाग, भिवापूर

Web Title: Nagpur: Mokhabardi Upsa Irrigation Scheme : Canal water in fields, loss of gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.