नागपुरात विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 10:13 PM2018-03-13T22:13:03+5:302018-03-13T22:13:14+5:30
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना कमाल तीन वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना कमाल तीन वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
नीलेश अशोक रामटेके (३०) व गुड्डू ऊर्फ शशिकांत रामरतन कापसे (४०) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना भादंविच्या कलम ४५२ अंतर्गत ३ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, कलम ३५४(अ) अंतर्गत २ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, कलम ५०६ व ५०० अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास तर, पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत २ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही घटना कामठी येथे घडली होती. १६ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपींनी पीडित मुलीचा विनयभंग केला. तसेच, मुलीला व तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. सहायक पोलीस निरीक्षक श्रावण सुरजुसे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. पंकज तपासे यांनी बाजू मांडली.