नागपुरात पॉलिसीचे आमिष दाखवून रक्कम लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 07:57 PM2020-06-19T19:57:50+5:302020-06-19T19:59:34+5:30
एलआयसी प्लॅनमध्ये रक्कम गुंतवायची आहे असे आमिष दाखवून एका तरुणीने एलआयसी एजंटला सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलवले आणि तिच्या साथीदारांनी त्याला मारहाण करून त्याचे २० हजार रुपये लुटून नेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एलआयसी प्लॅनमध्ये रक्कम गुंतवायची आहे असे आमिष दाखवून एका तरुणीने एलआयसी एजंटला सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलवले आणि तिच्या साथीदारांनी त्याला मारहाण करून त्याचे २० हजार रुपये लुटून नेले. सोमलवाडा चौकाजवळ गुरुवारी दुपारी १.४५ च्या सुमारास ही घटना घडली. सुजय श्रीपाद गोडसे (वय ३९) असे तक्रार करणाऱ्याचे नाव आहे. ते सिव्हिल लाईन्समधील फॉरेस्ट सोसायटीत राहतात. गोडसे एलआयसी एजंट आहेत. त्यांना रिया नामक तरुणीचा फोन आला. तुमच्याकडे काही चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत का, अशी तिने विचारणा केली. गोडसेने तिला एलआयसीतील वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना सांगितल्या. त्यातील एका योजनेत रक्कम गुंतवायची आहे, असे सांगून कथित रियाने गोडसे यांना गुरुवारी दुपारी सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्वेनगरात बोलविले. गोडसे तेथे पोहोचले. रिया आलीच नाही मात्र तिचे तीन साथीदार तिथे पोहोचले. त्यांनी गोडसेला मारहाण करून आपल्या दुचाकीवर बसविले आणि सोमलवाडा चौकाजवळच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये घेऊन गेले. तेथे गोडसेंना त्यांच्या एटीएम कार्डमधून जबरदस्तीने २० हजार रुपये काढायला लावले. ती रक्कम घेऊन धमकी देत आरोपी पळून गेले. गोडसे यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी जबरी चोरी आणि मारहाण करून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे
आरडाओरड का केली नाही!
भरदुपारी वर्दळीच्या भागात ही घटना घडली. त्यामुळे गोडसे यांनी मदतीसाठी आरडाओरड का केली नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या घटनेमागे दुसरे काही कारण आहे का, पोलीस त्याचीही चौकशी करीत आहेत.