नागपुरात गांधीबाग, अयोध्यानगरमध्ये सर्वाधिक ‘धडामधूम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:25 PM2020-11-20T22:25:43+5:302020-11-20T22:26:04+5:30
Diwali Nagpur News यंदा ‘कोरोना’च्या सावटात दिवाळी साजरी झाल्याने फटाक्यांच्या वापरावर मर्यादा होती. मात्र तरीदेखील अपेक्षेपेक्षा जास्त फटाके फुटले. असे असले तरी ‘ग्रीन’ तंत्रज्ञानामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी मात्र दरवर्षीपेक्षा घटल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा ‘कोरोना’च्या सावटात दिवाळी साजरी झाल्याने फटाक्यांच्या वापरावर मर्यादा होती. मात्र तरीदेखील अपेक्षेपेक्षा जास्त फटाके फुटले. असे असले तरी ‘ग्रीन’ तंत्रज्ञानामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी मात्र दरवर्षीपेक्षा घटल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात ध्वनिप्रदूषणाची एकूणच डोकेदुखी कमी होती. बहुतांश भागांमध्ये ६० ते ७० डेसिबल्स इतके आवाजाचे प्रमाण होते. केवळ सात भागांमध्ये ७५ डेसिबल्सहून जास्त आवाज नोंदविण्यात आला. ‘नीरी’च्या ‘नॉईज ट्रॅकर’ या ‘मोबाईल अॅप’च्या माध्यमातून शहरातील ध्वनिप्रदूषणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार निवासी क्षेत्रासाठी सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल्स तर रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ४५ डेसिबल्सपर्यंत आहे. मागील वर्षी दिवाळीच्या कालावधीत शहरात सरासरी आवाजाची पातळी ६२.५ ते ८०.८ डेसिबल्स इतकी नोंदविण्यात आली होती. यंदा बहुतांश ठिकाणी हेच प्रमाण ६५ ते ७४ डेसिबल्स इतके होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मर्यादेपेक्षा आवाजाची पातळी जास्त असली तरी दरवर्षीच्या तुलनेत निश्चितच ध्वनिप्रदूषण कमी होते. ‘नीरी’तील ध्वनितज्ज्ञ सतीश लोखंडे यांच्यासह अल्फाज हिरानी, प्रशांत चोपकर आणि महिंद्र जैन यांनी हा अहवाल तयार केला आहे.
सात ठिकाणी पातळी अधिक
एकूण ६६ ठिकाणांहून ध्वनीचे आकडे घेण्यात आले. त्यापैकी ४२ ठिकाणी आवाजाची पातळी ७० डेसिबल्सच्या आत होती. तर २२ ठिकाणी ७० ते ७५ डेसिबल्सच आत आवाज होता. नरसाळा हुडकेश्वर, श्री राम नगर हुडकेश्वर, लक्ष्मी नगर, गांजीपेठ मोमीनपुरा, गांजाखेत चौक गांधीबाग, अयोध्या नगर मानेवाडा आणि नागराज नगर-नारी रोड या सात ठिकाणीच ७५ डेसिबल्सहून जास्त आवाज नोंदविल्या गेला.