नागपुरात मोटार अपघात दावा ३३ लाखांत निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:20 PM2018-02-12T23:20:16+5:302018-02-12T23:24:40+5:30
राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयातील पॅनलने पाच वर्षे जुना मोटार अपघात दावा ३३ लाख रुपये भरपाईवर तडजोड पक्की करून निकाली काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयातील पॅनलने पाच वर्षे जुना मोटार अपघात दावा ३३ लाख रुपये भरपाईवर तडजोड पक्की करून निकाली काढला.
लोक न्यायालयात दिवाणी व मोटार अपघात दावे, फौजदारी व कौटुंबिक प्रकरणे, धनादेश अवमानना प्रकरणे यासह विविध प्रकारची एकूण ३४ हजार ४४६ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११ हजार ३८० प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. पॅनलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. मनीष पितळे, सेवानिवृत्त न्यायमूर्ती डी. एस. झोटिंग यांच्यासह इतरांचा समावेश होता. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. व्ही. पी. गायकवाड, सचिव न्या. कुणाल जाधव आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
तृतीयपंथी विद्या कांबळेंचे पॅनल
एका पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा विधी स्वयंसेवक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. मुरकुटे पॅनल प्रमुख तर, अॅड. रोहिणी देशपांडे वकील सदस्य होत्या. या पॅनलने दोन मोटार अपघात दावे २८ लाख ५० हजार व १९ लाख रुपयांत तडजोड करून निकाली काढले.
अलंकार सिनेमागृहाचा वाद मिटला
लोक न्यायालयात अलंकार सिनेमागृहाच्या मालकीहक्काचा वाद तडजोडीने मिटला. दावेदार प्रियंका महेशकर यांना ६० टक्के तर, प्रतिवादी पाच वारसदारांना ४० टक्के मालकीहक्क देण्यात आला. सिनेमागृहाच्या पूर्ण मालकीहक्कासाठी प्रियंका यांनी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. प्रियंका यांनी स्वत: तर, प्रतिवादींतर्फे अॅड. अंकुर कपले यांनी बाजू मांडली.
ताजुद्दीन ट्रस्ट व खादिमांत तडजोड
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट व खुदाम दर्गा कमिटीमधील चिरागी व अन्य वाद लोक न्यायालयामध्ये तडजोडीने संपविण्यात आले. याप्रकरणात २० अटी निर्धारित करण्यात आल्या. त्यानुसार, ताजुद्दीन बाबा दरबारात चार ते सहा खादीम गणवेशात सेवा प्रदान करतील. त्यांना भाविकांकडून बळजबरीने चिरागी किंवा नजराणा घेता येणार नाही. अटींचे उल्लंघन करणाऱ्या खादिमांवर कारवाई केली जाईल. तडजोडीसाठी ट्रस्टचे प्रशासक गुणवंत कुबडे व कमिटीचे अॅड. आनंद परचुरे यांनी सहकार्य केले.