नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन २०२१ मध्ये धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:48 AM2017-07-18T01:48:21+5:302017-07-18T01:48:21+5:30
नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे.
प्रकल्पाला मंजुरी : ४.३० तासात मुंबईला पोहचणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने मुंबई-अहमदाबाद याशिवाय दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर, दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई व मुंबई-नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याच्या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेन २०२१-२२ पासून धावणार आहे. या ट्रेनला चार थांबे प्रस्तावित आहेत. यात नाशिक, अकोला व औरंगाबाद आदींचा समावेश आहे. ही ट्रेन नागपूर ते मुंबई हे अंतर ४.३० तासात पूर्ण करणार आहे. या प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल आॅक्टोबर महिन्यात दिला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हायस्पीड कॉर्पोरेशनने दिल्ली-अमृतसर मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याबाबतचा व्यवहारिकता अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. दिल्ली-कोलकाता मार्गाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे तसेच कॉर्पोरेशन नागपूर-मुंबई प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल तयार करीत आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला आहे. या मार्गावर बुलेट ट्रेन औरंगाबादमार्गे चालविण्याची सूचना केली आहे. या मार्गावर काही थांबे सुचविण्यात आले आहेत. यात नाशिक, औरंगाबाद व अकोला आदींचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन हा प्रकल्प विदर्भ व मराठवाडा विभागाचा विकास लक्षात ठेवून राबविला जाणार आहे. २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.