काय सांगता! नागपूर-मुंबई फ्लाईट तिकीट चक्क २१ हजारांवर??
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 04:12 PM2022-12-30T16:12:01+5:302022-12-30T20:03:00+5:30
मुंबईकर पाहुण्यांनी वाढविले विमानाच्या तिकिटांचे भाव
शताली शेडमाके
नागपूर : विधिमंडळ अधिवशेनाचा आज (दि. ३०) शेवटचा दिवस तर उद्या 'थर्टी फर्स्ट'चे सेलिब्रेशन, त्यामुळे अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पाहुण्यांनी आजच परतीचा मार्ग धरलाय. याचाच फायदा विमान कंपन्यांनी घेत तिकिटांचे दर चक्क २१ हजारांपर्यंत वाढविल्याचे दिसत आहे. सध्या नागपूरवरून निघणाऱ्या सर्व फ्लाईट्सचे बुकिंग फुल्ल झाले असून फक्त रात्री पावणे अकराच्या एका विमान कंपनीच्या फ्लाइटमध्ये काही सीट्स उपलब्ध आहेत. मात्र, तिकिटांची किंमत २१ हजार रुपयांपर्यंत वाढली आहे.
नागपूर-मुंबई विमानाचा प्रवास साधारणत: ५ हजारांच्या जवळपास आहे. पण अधिवेशन काळात नागपूर-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मंत्री, आमदार, अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी हे विमानप्रवासाला प्राथमिकता देतात. दोन आठवड्यांपासून ही सर्व मंडळी नागपुरात वास्तव्याला होती. तर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून त्यानंतर सर्वांची परतीची लगबग आहे. अनेकांनी आधीच बुकींग करून ठेवलं आहे. तर काहीजण कामकाज आटोपून निघणार आहेत.
थर्टी फर्स्ट, न्यू ईअर साजरा करायला जाणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावर विमानांची उपलब्धता पाहता तिकिटे फुल्ल झाली असून काहीच सीट्स शिल्लक आहेत. याचाच फायदा घेत विमान कंपन्यांनीही तिकीटदरात वाढ केली आहे. शिल्लक तिकिटांचा दर चक्क २१ हजारांवर गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.