नागपूर मनपा आयुक्त रजेवर, सभा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:01 PM2018-09-04T23:01:16+5:302018-09-04T23:02:22+5:30
कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सभा स्थगित करण्यात यावी. अशी मागणी सत्तापक्ष नेते व विरोधी पक्षनेते यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली. त्यानुसार महापौर नंदा जिचकार यांनी सभा स्थगित करून २४ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला. तसेच या सभेला आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सभा स्थगित करण्यात यावी. अशी मागणी सत्तापक्ष नेते व विरोधी पक्षनेते यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली. त्यानुसार महापौर नंदा जिचकार यांनी सभा स्थगित करून २४ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला. तसेच या सभेला आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
आजवर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आयुक्त उपस्थित नसल्यास सभा रद्द करण्याचे प्रकार अनेकदा घडले. परंतु सभागृहाच्या एक दिवसाआधी सभा स्थगित करण्याचा प्रकार प्रथमच घडला. आयुक्तांच्या कार्यप्रणालीमुळे सत्ताधारी नाराज आहेत. विरोधकांनी तर बिकट आर्थिक स्थितीच्या मुद्यावरून महापालिका बरखास्त करण्याबाबतचा प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. आयुक्त नसल्याने सभा स्थगित करण्यासंदर्भात सत्तापक्षनेते संदीप जोशी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील बहुतांश विषय आयुक्तांशी संबंधित आहेत. त्यातच अपर आयुक्त व उपायुक्त नवीन आलेले आहेत. त्यामुळे आयुक्त उपस्थित असणे गरजेचे असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. आयुक्त १५ दिवसांच्या रजेवर आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रानंतर २४ सप्टेंबरला सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती या आधीही चांगली नव्हती. परंतु कामकाज सुरू होते. आता मूलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध होत नाही. हे समजण्यापलीकडील आहे. के्रडाईचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. त्यांनीही आयुक्तांच्या व्यवहारावर नाराजी व्यक्त केली. एकंदरीत आयुक्तांचे वागणे शहरातील जनतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यांची तक्रार मुख्यमंत्र्याकडे केलेली नाही. परंतु आयुक्तांनी जनतेचे हित विचारात घेता महापालिकेच्या कामकाजाची पद्धती जाणून घेण्याची गरज असल्याचे जोशी म्हणाले.
स्थायी समितीची परवानगी घेतली नाही
आयुक्तांना रजेवर जावयाचे असल्यास महापालिका कायद्यानुसारर स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते. मंजुरीनंतरच त्यांनी रजेवर जाणे अपेक्षित आहे. परंतु आयुक्तांनी सोमवारी स्थायी समितीला विनंती पत्र पाठविले. मात्र पत्रात खालच्या बाजूला माहितीस्तव म्हटले आहे. यावरून आयुक्तांनी समितीची परवानगी घेतलेली नाही. फक्त सूचना दिली आहे.
१६ लाखांची कार का खरेदी केली
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. गडर लाईन,चेंबर अशा फाईल मंजूर होत नाही. मग आयुक्तांनी १६ लाखांची नवीन कार खरेदी कशी केली. ही कार स्मार्ट प्रकल्पातून घेतल्याची चर्चा आहे. पण पैसे तर महापालिकेचेच आहेत. स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, कर सभापती संदीप जाधव टॅक्स वसुलीसाठी बैठका घेत आहेत. मात्र आयुक्तांनी टॅक्स वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही. त्यातच त्यांनी निविदा समिती गठित केली. यामागील कारण समजले नाही, असेही जोशी यांनी सांगितले.