महालमधील तब्बल ३५६ दुकाने भूईसपाट; ९ मजली वाणिज्यिक संकुल बनणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 11:25 AM2022-11-26T11:25:04+5:302022-11-26T11:35:39+5:30
दुकाने, ओटे, जागा केल्या रिकाम्या; नोटस बजावून कारवाई, पोलीस बंदोबस्त
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या महाल येथील बुधवार बाजाराच्या जागेवर असलेल्या ३५६ परवानाधारकांवर कारवाई करीत त्यांचे दुकाने/ओटे/जागा रिकामे करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेच्या बुधवार बाजार महाल येथील जागेवर नवीन ९ माळ्याचे वाणिज्यिक संकुल बांधण्याचा निर्णय मनपा सभागृहाने घेतला होता. बुधवार बाजारात मनपा बाजार विभागाच्या परवान्यावर ३५६ परवानाधारक जागेचा वापर करीत होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या तरतुदीअंतर्गत कार्यवाहीच्या अनुषंगाने सर्व परवानेधारकाना नोटीस बजावण्यात आली होता. नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत जागा खाली करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आले होते. परंतु एक महिन्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही परवानाधारकांकडून जागा खाली करण्यात आली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात सकाळी ११ वाजतापासून अतिक्रमण विभागाच्या तीन पथकाद्वारे बाजार खाली करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या वेळी सहायक आयुक्त गणेश राठोड, बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे, सहायक अधीक्षक कल्याण खोब्रागडे आदी उपस्थित होते.
- कामगारनगर अनधिकृत दुकानांवर चालणार जेसीबी
उत्तर नागपुरातील मौजा नारी, कामगारनगर भागात नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवारी एका चिकन सेंटरसह १२ अनधिकृत दुकानांवर कारवाई केली. ही कारवाई करण्यापूर्वी अनधिकृत दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यांनी जागेवरून ताबा सोडला नसल्याने शुक्रवारी अतिक्रमण पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान लोकांनी विरोध केला. मात्र पोलीस बंदोबस्त तगडा असल्याने कारवाई शांततेत पार पडली.
ही कारवाई कार्यकारी अभियंता पोहेरक, विभागीय अधिकारी कमलेश टेंभूर्णा यांच्या मार्गदर्शनात व कपिलनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल देशमुख यांच्या उपस्थित पार पडली.