आता 'या' क्रमांकावर नागरी समस्येची तक्रार; नागपूरकरांसाठी मनपाने जारी केला नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 02:46 PM2022-11-29T14:46:40+5:302022-11-29T14:47:16+5:30
व्हॉट्सॲप आणि लाईव्ह सिटी ॲपवर येणाऱ्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही करण्यासाठी मनपाद्वारे तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
नागपूर : जनतेला नागरी समस्यांबाबत तक्रारी नोंदविण्यात सुलभता प्रदान करण्यासाठी महापालिकेने एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. त्यामुळे आता जनतेला लाईव्ह सिटी ॲपबरोबरच व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करता येईल.
मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागरी तक्रारींच्या संदर्भात नुकतीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी व्हाॅट्सॲप क्रमांक सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी नागपूर लाईव्ह सिटी ॲप आणि सोशल मीडियावर येणाऱ्या तक्रारींचा सुद्धा आढावा घेतला. बैठकीत उपायुक्त निर्भय जैन, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा व सर्व सहायक आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
८६००००४७४६ या क्रमांकावर नागरिकांनी त्यांच्या परिसरात असलेल्या समस्येचे फोटो काढून त्यासोबत संपूर्ण पत्ता आणि माहिती तक्रारकर्त्याच्या नावासह पाठवावा. व्हॉट्सॲप आणि लाईव्ह सिटी ॲपवर येणाऱ्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही करण्यासाठी मनपाद्वारे तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेत कार्यरत कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांनी प्रत्येक तक्रारीला प्राधान्याने वेळ देऊन ती संबंधित विभागाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. प्रलंबित तक्रारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे, तक्रारदारांना समाधानकारक प्रतिसाद देण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले. सोबतच स्वच्छता ॲपवर घनकचरा व्यवस्थापन संदर्भातील तक्रारी नोंदवाव्यात. जेणेकरून या स्वरूपाच्या तक्रारी १२ तासात निकाली काढण्यात येतील.