नागपूर मनपा : दिवाळी संपली;आता टॅक्स वसुली : आचारसंहितेमुळे वसुलीला २८ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 10:46 PM2019-10-30T22:46:07+5:302019-10-30T22:46:56+5:30
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीला विधानसभा निवडणुकीचा फटका बसला. निवडणूक संपल्याने मालमत्ता विभाग आता पुन्हा सक्रिय झाला असून थकबाकी वसुलीच्या कामाला लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीला विधानसभा निवडणुकीचा फटका बसला. निवडणूक आचारसंहितेपूर्वी वसुलीने जोर पकडला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत वसुली ३५ कोटींनी अधिक होती.आचारसंहिता लागू होताच मालमत्ता विभागातील २०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले. यामुळे वसुली ठप्प पडली होती. २३ ऑक्टोबरपर्यत ११७ कोटींचीच कर वसुली झाली. गेल्या वर्षी या तारखेला ९७ कोटींची वसुली झाली. निवडणूक नसती तर वसुली १४५ कोटीवर गेली असती. आचारसंहितेमुळे वसुलीला २८ कोटींचा फटका बसला. निवडणूक संपल्याने मालमत्ता विभाग आता पुन्हा सक्रिय झाला असून थकबाकी वसुलीच्या कामाला लागला आहे.
मालमत्ता कर वसुलीचे गेल्या वर्षी उद्दिष्ट ५०९ कोटी होते. परंतु वसुली २३० कोटीवर थांबल्याने यंदा उद्दिष्ट कमी करून ४५० कोटी ठेवण्यात आले आहे. २० सप्टेेंबर २०१९ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कर वसुलीतून ९७ कोटी जमा झाले. गेल्या वर्षात याच कालावधीत ६७ कोटी जमा झाले होते. विभागाची वसुली ३० कोटींनी वाढली होती. त्यानंतर कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने याचा कर वसुलीवर परिणाम झाला.
१ लाख ७७ हजार लोकांनी चालू वर्षातील कर भरला. तर ८० हजार ६७६ थकबाकीदारांनी कर भरला. अजूनही ३ लाख ६२ हजार ४५९ मालमत्ताधारकांकडे ४७३ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी भरावी यासाठी महापालिकेतर्फे आकाशवाणी, सिमेनागृह, वृत्त वाहिन्यावर प्रसिद्धी करून मुदतीपूर्वी कर व थकबाकी भरून कायदेशीर कारवाई टाळण्याचे आवाहन केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
७०० वॉरंट बजावले
थकबाकीदारांना वारंवार नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने ७०० मालमत्ताधारकांवर वॉरंट बजावण्यात आले. ३२० मालमत्ता जप्त करण्यात आल्या. जप्तीनंतरही थकबाकी न भरणाऱ्यांची मालमत्ता लिलावात काढण्यात आली. विशेष म्हणजे लिलावात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना जागेची आखीव पत्रिका दिली जात आहे. नगररचना विभागात संबंधितांच्या नावाची नोंद केली जात आहे.