नागपूर मनपा निवडणूक आरक्षण : काही मातब्बरांना हादरे, इतरांचे प्रभाग सुरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 02:02 PM2022-07-30T14:02:52+5:302022-07-30T14:11:27+5:30

तिवारी, जोशी, भोयर, वनवे सुरक्षित : होले, डोरले, ग्वालबंशी यांचे प्रभाग आरक्षित

Nagpur Municipal corporation Election Reservation : Some seniors gets shock, others' wards are safe | नागपूर मनपा निवडणूक आरक्षण : काही मातब्बरांना हादरे, इतरांचे प्रभाग सुरक्षित!

नागपूर मनपा निवडणूक आरक्षण : काही मातब्बरांना हादरे, इतरांचे प्रभाग सुरक्षित!

Next

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण कायम ठेवत उर्वरित जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा जागांसाठी शुक्रवारी सोडतीद्वारे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले. या आरक्षणाचा फटका माजी उपमहापौर सतीश होले, माजी महापौर किशोर डोरले, हरीश ग्वालबंशी यांच्यासह काही माजी नगरसेवकांना बसला आहे, तर माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, माजी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर यांचे प्रभाग सुरक्षित आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसलेनगर भवन (टाऊ न हॉल) ही सोडत काढण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त प्रकाश वराडे, सहायक आयुक्त महेश धामेचा आदी उपस्थित होते.

माजी उपमहापौर सतीश होले यांच्या प्रभाग क्रमांक ३३ मधील एक जागा अनुसूचित जाती व दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने होले यांची अडचण झाली आहे. आता ते प्रभाग ४६ मधून लढण्याच्या तयारीत आहेत. माजी महापौर किशोर डोरले यांनी प्रभाग ८ मधून निवडणुकीची तयारी केली होती. मात्र या प्रभागात एक जागा अनुसूचित जमाती व दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. ते आता प्रभाग १०मधून लढतील. हरीश ग्वालबंशी यांच्या प्रभाग २० मधील एक जागा अनुसूचित जमाती व दोन जागा महिलासांठी राखीव झाल्याने तेती आता बाजूचा प्रभागातून लढणार आहेत. इतर काही माजी नगरसेवकांची अशीच अडचण झाली आहे.

माजी महापौर दयाशंकर तिवारी यांचा प्रभाग २३ सुरक्षित आहे. या प्रभागात एक जागा सर्वसाधारण तर एक ओबीसी साठी राखीव झाल्याने तिवारी यांना अडचण नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर यांना प्रभाग ४२ मधून लढण्यास पुन्हा संधी आहे. माजी महापौर संदीप जोशी यांनाही प्रभाग ४०मधून लढण्याला संधी आहे. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांना प्रभाग ३०मधून लढण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. माजी शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांचाही प्रभाग ४१ सुरक्षित आहे. तसेच प्रफुल्ल गुडधे व अविनाश ठाकरे यांनाही पुन्हा लढण्याची संधी उपलब्ध आहे.

३१ मे २०२२पर्यंतच्या मतदार यादीनुसार २२ लाख ४५ हजार ८०९ मतदार महापालिका निवडणुकीत मतदार आहेत. या लोकसंख्येनुसार एकूण ५२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. सर्व प्रभाग तीन सदस्यांचा सदस्यांचा आहे. या प्रभागांमधून एकूण १५६ नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ७८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जातीसाठी एकूण ३१ जागा आरक्षित असून, अनुसूचित जाती महिलांसाठी १६ जागा आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी १२ जागांचे सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. यातील सहा जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. ७८ जागा सर्वसाधारण असून, या प्रवर्गातील महिलांसाठी ३८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. 

प्रभागांची एकूण संख्या -५२

नगरसेवकांची संख्या -१५६

महिला आरक्षण -७८

संवर्ग व एकूण जागा

अनुसूचित जाती - ३१

अनुसूचित जमाती - १२

नागरिकांचा मागास प्रवर्ग - ३५

सर्वसाधारण - ७८

एकूण - १५६

महिलांकरिता राखीव

अनुसूचित जाती -१६

अनुसूचित जमाती -६

नागरिकांचा मागास प्रवर्ग -१८

सर्वसाधारण -३८

एकूण - ७८

Web Title: Nagpur Municipal corporation Election Reservation : Some seniors gets shock, others' wards are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.