नागपूर मनपाने मुसक्या आवळताच कनक वठणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:25 PM2018-05-14T23:25:48+5:302018-05-14T23:26:13+5:30

मनमानी बिल सादर करून २४ कोटी ६० लाख अतिरिक्त मिळवणाऱ्या कनक रिसोर्सेसकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करताच कचरा उचलण्याचे काम बंद करण्याची धमकी देऊन महापालिकेला वेठीस धरण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. परंतु या धमकीला न जुमानता महापालिका प्रशासनाने कनकला वठणीवर आणत अतिरिक्त रक्कम वसूल निर्णय घेतला. तसेच कचरा संकलनाचे काम बंद न करण्याची हमी घेतली.

Nagpur Municipal Corporation initiate action Kanak on right ways | नागपूर मनपाने मुसक्या आवळताच कनक वठणीवर

नागपूर मनपाने मुसक्या आवळताच कनक वठणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा २४.६० कोटींची वसुली करणार : काम बंद न करण्याची दिली हमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनमानी बिल सादर करून २४ कोटी ६० लाख अतिरिक्त मिळवणाऱ्या कनक रिसोर्सेसकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करताच कचरा उचलण्याचे काम बंद करण्याची धमकी देऊन महापालिकेला वेठीस धरण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. परंतु या धमकीला न जुमानता महापालिका प्रशासनाने कनकला वठणीवर आणत अतिरिक्त रक्कम वसूल निर्णय घेतला. तसेच कचरा संकलनाचे काम बंद न करण्याची हमी घेतली.
कनकला अतिरिक्त देण्यात आलेल्या रकमेसंदर्भात आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी सोमवारी बैठक घेतली. यात प्रामुख्याने दोन मुद्यांवर चर्चा झाली. पहिला कनकची काम करण्याची तयारी आहे की नाही आणि दुसरा अतिरिक्त रक्कम परत करणार की नाही. या दोन्ही मुद्यावर कनकने सहमती दर्शविली. कनकच्या मानमानी विरोधात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आयुक्तांनी याची दखल घेत आरोग्य विभागाची तातडीची बैठक आयोजित केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, आरोग्य अधिकारी(स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह कनक रिसोर्सेसचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कनककडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यावर चर्चा झाली. आयुक्तांनी ठोस भूमिका घेत अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला. सोबतच कचरा उचलण्याचे काम बंद करणार नाही, अशी हमीही घेतली. काम बंद करावयाचेच असेल तर महापालिकेला पूर्वसूचना द्यावी. पर्यायी व्यवस्था करण्यास महापालिका सक्षम असल्याचे कनकला बजावले. सूत्रांच्या माहितीनुसार कनकने पहिल्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली होती परंतु आज नरमाईचे धोरण स्वीकारले.
दर महिन्याच्या बिलातून वसुली
गेल्या दोन महिन्याचे नऊ कोटीचे बिल महापालिकेने थांबविले आहे. ही रक्कम अतिरिक्त रकमेत समायोजित केली जाणार आहे. तसेच उर्वरित १५.६० कोटींची रक्कम कनकच्या दर महिन्याच्या बिलातून वसूल केली जाणार आहे. कनकचा कंत्राट १५ फेबु्रवारी २०१९ पर्यंत असल्याने दर महिन्याला १ कोटी ५० लाख बिलातून कपात करण्यात येणार आहे.
१३०६ प्रति टन मोबदला
कनकने कंत्राट घेतला तेव्हा प्रति टन ४४९ रुपये दर ठरला होता. यात दर तीन महिन्यांनी वृद्धी केली जात होती. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढल्यानंतर कनकला प्रति टन १०३३ रुपये प्रति टन मोबदला दिला जात होता. मात्र कनकने प्रति टन १६०६ रुपयांची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने १३०६ रुपये प्रति टन दराने मोबदला देण्याचे बैठकीत मान्य केले.
कचरा संकलनावर परिणाम नाही
कचरा संकलनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात कचरा संकलनाचे काम सुरू ठेवणे व अतिरिक्त उचल केलेली रक्कम वसूल करण्यावर चर्चा झाली. हे दोन्ही मुद्दे कनक रिसोर्सेसने निर्माण केले होते. त्यामुळे शहरातील कचरा संकलनावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली. तसेच कनकने उपस्थित केलेला कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्त्याच्या मागणीचा विषय स्थायी समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Nagpur Municipal Corporation initiate action Kanak on right ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.