नागपूर मनपा : नाव ठाकरेंचे, सभापती बनले धनविजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:09 AM2019-12-28T00:09:18+5:302019-12-28T00:11:14+5:30

राज्यातील सत्ता गमावल्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर स्पष्ट दिसू लागला आहे. कर संकलन समिती सभापतीसाठी अविनाश ठाकरे यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु भाजपने सभापतीसाठी महेंद्र धनविजय यांचे नाव पुढे केले.

Nagpur Municipal Corporation: Nomination Thackeray but Dhanvijay becomes chairman | नागपूर मनपा : नाव ठाकरेंचे, सभापती बनले धनविजय

नागपूर मनपा : नाव ठाकरेंचे, सभापती बनले धनविजय

Next
ठळक मुद्देपरिवहन समितीची जबाबदारी बोरकरांना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सत्ता गमावल्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर स्पष्ट दिसू लागला आहे. कर संकलन समिती सभापतीसाठी अविनाश ठाकरे यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु भाजपने सभापतीसाठी महेंद्र धनविजय यांचे नाव पुढे केले. तसेच परिवहन समिती सभापतीसाठी बाल्या बोरकर यांनी अर्ज भरला. दोघेही बिनविरोध निवडून आले. परंतु या दोन्ही समितीच्या निवडणुकीवरून मनपात चांगलीच चर्चा रंगली.
सूत्रांनुसार अविनाश ठाकरे यांना निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी गुरुवारी दुपारी ३.३० वाजता सत्तापक्ष कार्यालयाकडून असे सांगण्यात आले की, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयात हजर राहायचे आहे. ठाकरे कौटुंबिक कामामुळे पुण्यात होते. त्यांनी इतक्या कमी वेळेत पुण्यावरून नागपूरला पोहोचणे शक्य होणार नसल्याने आपली असमर्थता दर्शविली. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वीच कर व परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. अशा परिस्थितीत एक दिवसापूर्वी सभापतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना देणे, हे समजण्यापलिकडे आहे. यामुळे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांचे अपयश स्पष्टपणे दिसून येते. त्यांची कार्यालयात येण्याची व जाण्याची कुठलीही निश्चित वेळ नाही. तेव्हा यासंदर्भात जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. मनपात अशीही चर्चा आहे की, ठाकरे यांना जाणिवपूर्वक निवडणूक कार्यक्रमाची माहिती उशिरा देण्यात आली. जेणेकरून ते उपस्थित राहू नये. ठाकरे यांना सभापती पद न मिळाल्याने, ओबीसी नगरसेवकांप्रति भाजपाचा उदासीनपणा उघडकीस आल्याचीही चर्चा होती.
यासंदर्भात अविनाश ठाकरे यांनी सांगितले की, ते पुण्यात कौटुंबिक कारणामुळे आले आहेत. गुरुवारी दुपारी त्यांना निवडणुकीची माहिती मिळाली. इतक्या कमी वेळेत मी नागपूरला पोहोचू शकलो नसतो.
सूत्रानुसार निवडणूक कार्यक्रमाची माहिती ठाकरे यांना वेळेवर न देणे, परिवहन सभापतीच्या कक्षात बदल यावरून मनपा मुख्यालयात भाजपचे वरिष्ठ नेते व वरिष्ठ नगरसेवक यांच्यात चांगलाच वाद झाला. संबंधित वरिष्ठ नेते शुक्रवारी अर्ज भरताना गैरहजर होते.

बिनविरोध झाली निवडणूक
भाजपकडून परिवहन समिती सभापतिपदासाठी नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि कर संकलन समिती सभापती पदासाठी महेंद्र धनविजय यांनी उमेदवारी अर्ज भरला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका बजावली. बंटी कुकडे आणि संदीप जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. कायद्यानुसार दोन्ही सभापती उर्वरित कार्यकाळापर्यंत सभापती राहतील. २० डिसेंबर रोजी आयोजित सभेत बोरकर आणि अविनाश ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी बोरकर आणि धनविजय यांनी परिवहन व कर समिती सभापतसाठी अर्ज सादर केला.

जिथे होते, तिथेच आले
परिवहन समिती सभापती म्हणून नाव निश्चित झाल्यानंतर बाल्या बोरकर यांनी बुधवारी उपमहापौर मनिषा कोठे यांच्या पत्राच्या आधारे आपला कक्ष सचिवांच्या कक्षात शिफ्ट करण्याची तयारी सुरु केली होती. बुधवारी तातडीने सामान शिफ्ट करण्यात आले. परंतु गुरुवारी असे चक्र फिरले की, शुक्रवारी सभापती कक्ष त्यांच्या मूळ जागीच शिफ्ट झाले. २४ तासात कक्ष शिफ्ट झाल्याचीही मनपात चर्चा होती. महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असून शुक्रवारी ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता.

 

Web Title: Nagpur Municipal Corporation: Nomination Thackeray but Dhanvijay becomes chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.