लस आली तरी नागपूर मनपा तयारीत नाही; साठवणूक, शीतगृहाविषयी थंड हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 08:40 PM2020-12-07T20:40:37+5:302020-12-07T20:40:58+5:30
corona Nagpur News कोरोनावरील प्रतिबंधक लस फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने याबाबतची तयारी हाती घेतली आहे. लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माणकार्य हाती घेतले आहे. परंतु नागपुरात किती जणांना लस देणार, याचा आकडा महापालिकेकडे नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक लस फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने याबाबतची तयारी हाती घेतली आहे. लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माणकार्य हाती घेतले आहे. परंतु नागपुरात किती जणांना लस देणार, याचा आकडा महापालिकेकडे नाही. शिवाय, लसीच्या साठवणुकीसह त्याच्या शीतगृहाच्या व्यवस्थेविषयी हालचाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनावरील प्रतिबंधक लस असलेली ‘कोव्हॅक्सिन’ व ‘कोविशिल्ड’ची मानवी चाचणी नागपुरात सुरू आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला आणि दुसरा टप्पा नागपुरात पूर्ण झाला आहे. नुकतीच तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जात आहे. त्यानंतर ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. ‘कोविशिल्ड’ चाचणीचा तिसरा टप्पा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे. ५० स्वयंसेवकांना दुसरा डोजही देण्यात आला आहे. शासनाचे फेब्रुवारी महिन्यात प्रतिबंधात्मक लसीकरणाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण होणार आहे. त्यानुसार महानगरपालिकेने नोंदणी सुरू केली आहे. परंतु दोन महिन्याचा कालावधी होऊनही खासगीमधील ६४० हॉस्पिटलची यादी २५० हॉस्पिटलपर्यंत येऊन थांबली आहे.
तर, मुंबई महापालिकेने कोरोनाच्या प्रतिबंधक लसीसाठी कांजूरमार्ग परिवार संकुलात कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२१ पर्यंत शीतगृहांसाठी लागणारे बांधकाम, वीज याची व्यवस्था केली जाणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याविषयीही तयारीलाही त्यांनी वेग दिला आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आजही यासंदर्भातील वरिष्ठांच्या सूचनांची वाट पाहत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अद्यापही सूचना नाहीत
कोरोनावरील प्रतिबंधक लस नागपूरला कधी येणार, त्याला किती तापमान लागणार, याविषयी वरिष्ठांकडून कुठल्याही सूचना नाहीत. त्यानंतरच साठवणुकीची जागा, शीतगृहाचे काम हाती घेण्यात येईल.
-डॉ. नरेंद्र बहिरवार
आरोग्य अधिकारी, महापालिका, नागपूर