नागपूर मनपाला ‘टेन्शन’ ‘टॅक्स’ वसुलीचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:29 PM2020-03-02T12:29:13+5:302020-03-02T12:31:54+5:30
नागपूर महापालिका प्रशासनाने अधिकाधिक टॅक्स वसुली व्हावी, यासाठी कंबर कसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आर्थिक अडचणीत आहे. ८०० कोटींहून अधिक तातडीची देणी चुकती करायची आहेत. दुसरीकडे मालमत्ता कराची थकबाकी शेकडो कोटींमध्ये आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी यापूर्वीही महापालिकेने प्रयत्न केले, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. यावर्षीही प्रयत्न सुरू आहेत. आता शिल्लक एक महिन्यात अधिकाधिक टॅक्स वसुली व्हावी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. टॅक्स भरण्याकरिता सुविधा व्हावी, यासाठी सुटीच्या दिवशी झोन कार्यालयात टॅक्स भरण्याची सुविधा राहणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी वर्ष २०१९-२० मध्ये ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. तर वर्ष २०१८-१९ मध्ये वीरेंद्र कुकरेजा यांनी २९४४ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. अंदाजानुसार २०१९-२० या वर्षात प्रयत्न करूनही महापालिकेच्या तिजोरीत २४०० कोटी जमा होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची कपात होणार असल्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
शहरात विकास कामे व्हावीत, यासाठी आयुक्त प्रयत्नशील आहेत. परंतु यासठी निधीची उपलब्धता तितकीच महत्त्वाची असल्याने तिजोरीत महसूलही जमा करावयाचा आहे. त्यांनी सर्व विभागांना वसुलीवर लक्ष्य केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठीही अशीच कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासोबतच जप्ती मोहीम राबविली जात आहे.
वर्ष २०१९-२० मध्ये २३८८ कोटी खर्चाचा अंदाज आहे तर, उत्पन्न २४०० कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच स्थायी समितीचा अर्थसंकल्प व वास्तविक उत्पन्न यात दरवर्षी २० टक्के तफावत आहे. त्यातच मनपाकडे एकूण ४९५.५१ कोटींची देणी थकीत आहे. यावरून स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची कपात होण्याची शक्यता आहे. परंतु आयुक्तांच्या अर्थसंकल्पानंतर वस्तूस्थिती पुढे येणार आहे.
महिनाभरात धडाकेबाज निर्णय
मनपा प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिनाभरात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यात मनपाच्या चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कंत्राटदार जे. पी. एंटरप्रायजेसच काळ्या यादीत समावेश, कुख्यात संतोष आंबेकरचा अनधिकृ त बंगला तोडला, मनपाचे कर संग्राहक आनंद फुलझेले यांना निलंबित केले. शहरातील अवैध आठवडी बाजारांवर मोठी कारवाई, हिवताप निरीक्षक संजय चमके बडतर्फ, सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाईमुळे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना नोटीस, शहरातील रोजचे १२० पाणी टँकर बंद, आर्थिक टंचाईमुळे मंजूर विकास कामांना स्थगिती व शिस्तीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्क्याच्या आसपास गेली आहे.