नागपूर महापालिका अधिकाऱ्यांवर राहणार ‘स्मार्ट वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:05 AM2018-06-19T10:05:35+5:302018-06-19T10:05:42+5:30
मनपात नव्याने आलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आधुनिक यंत्रणेचा आधार घेत चांगलाच अंकुश कसला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट वॉच तयार करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाचे अधिकारी व कर्मचारी कार्यस्थळावरून गायब राहत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मनपात नव्याने आलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आधुनिक यंत्रणेचा आधार घेत चांगलाच अंकुश कसला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट वॉच तयार करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही स्मार्ट वॉच केवळ सफाई कर्मचाऱ्यांनाच देण्यात येणार होती; नंतर मात्र मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनासुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वत: मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातालासुद्धा स्मार्ट वॉच राहणार आहे. मनपात कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी आपल्या टेबलवर उपस्थित नसतात, अशा तक्रारी वाढल्या होत्या.
सिंह यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कार्यालयाचे निरीक्षण केले. यात अनेक कर्मचारी आपल्या कार्यस्थळी आढळून आले नाही. त्यावर उपाय म्हणून सर्वांना स्मार्ट वॉच देण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांसह ३२ अधिकाऱ्यांना स्मार्ट वॉच देण्यात आली. त्यांची मशीनमध्ये नोंदणी करण्यास सांगण्यात आले. मनपा आयुक्त सिंह यांनी सांगितले की, स्मार्ट वॉचचा वापर म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होणार नाही. केवळ कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत ट्रॅकिंग करण्यात येईल. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ट्रॅकिंग बंद करण्यात येईल. सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांमध्ये राहून आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, हीच अपेक्षा आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नवनियुक्त उपायुक्त नितीन कापडनीस, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आयटीआय लि. चे अभय खरे यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
कामाच्या वेळेची माहिती मिळेल
अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या क्षेत्राचे जियो फेंसिंग करण्यात येईल. जेव्हा कर्मचारी स्मार्ट वॉच लावून आपल्या क्षेत्रात प्रवेश करेल, तेव्हा त्यांची रिअल टायमिंग दाखल होईल. यावरून हे लक्षात येईल, की कर्मचारी किती वेळ आपल्या कामावर उपस्थित होता. ही सर्व माहिती मनपा आयुक्तांना त्यांच्या डॅशबोर्डावर दिसेल.
वाहनांवरही जीपीएस सिस्टीम
मनपा आयुक्त सिंह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या वाहनांचा सरकारी कामासाठी वापर करण्यात येतो की नाही यावर सुद्धा नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लवकरच लावण्यात येईल.