नागपूर मनपाच्या भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता झाली २०० एमएलडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:47 PM2018-10-16T23:47:29+5:302018-10-16T23:48:28+5:30
भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्राची (एसटीपी) क्षमता १०० एमएलडीवरून २०० एमएलडी झाली आहे. जुलै २०१८ पासून वाढीव क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु यासाठी महापालिकेला २०१८-१९ या वर्षात एसटीपी आॅपरेटरला ५० कोटी द्यावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्राची (एसटीपी) क्षमता १०० एमएलडीवरून २०० एमएलडी झाली आहे. जुलै २०१८ पासून वाढीव क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु यासाठी महापालिकेला २०१८-१९ या वर्षात एसटीपी आॅपरेटरला ५० कोटी द्यावे लागणार आहे.
खासगी सहभागातून भांडेवाडी येथील एसटीपी केंद्राचा विस्तार करण्यात आला आहे. महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात एसटीपी केंद्रासाठी ३६ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी आपल्या स्वत:च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी पाच कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर स्थायी समितीनेही पाच कोटींचीच तरतूद कायम ठेवली. २०० एमएलडीचा प्रकल्प जुलै २०१८ मध्ये कार्यान्वित झाल्याने आॅपरेटला मार्च २०१९ पर्यंत ५० कोटी द्यावयाचे आहे. प्रत्येक महिन्याला चार कोटी आॅपरेटरला दिले तर ही रक्कम हप्त्यात देणे शक्य आहे. याबाबतची तरतूद करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. करारानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने आॅपरेटरला ही रक्कम द्यावयाची आहे.
या प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी कोराडी व खापरखेडा येथील विद्युत निर्मिती प्रकल्पांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु भांडेवाडी ते खापरखेडा या दरम्यान पाईप लाईन टाकलेली नाही. त्यामुळे प्रक्रिया करण्यात आलेले पाणी नदीत सोडण्याशिवाय पर्याय नाही.
महापालिके ला प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यापासून वर्षाला ३३.५ कोटी उत्पन्न मिळू शकते. कोराडी प्रकल्पाला १०० एमएलडी व खापरखेडा प्रकल्पाला ५०एमएलडी पाणी विकण्याचा प्रस्ताव आहे. परंतु पाईप लाईन टाकण्यासाठी दीड वर्ष लागणार आहे. दुसरीकडे २०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला वर्षाला ४०.६० कोटी खर्च करावे लागणार आहे.
सध्या भांडेवाडी येथील प्रक्रिया केलेले १३० एमएलडी सांडपाणी महाजनकोला दिले जाते. यातून महापालिकेला वर्षाला १५ कोटी मिळतात. मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पासोबत १५०एमएलडी पाण्याचा करार केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता २०० एमएलडीवरून ३०० एमएलडी करण्याच्या प्रस्तावाला या आधीच मंजुरी दिली आहे.
विशेष निधीतून एलपीजी शवदाहिनी
मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी यांच्या पत्रानुसार महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या विशेष निधीतून सहकार नगर दहन घाटावर एलपीजी शवदाहिनी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ४२.७९ लाखांचा खर्च होणार आहे. शासनाच्या विशेष निधीतून हा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या ई-निविदा काढून शवदाहिनी खरेदी केली जाणार आहे.