नागपूर मनपाची आरोग्याबाबतची अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:40 AM2018-06-02T01:40:13+5:302018-06-02T01:40:26+5:30
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडलेला आहे. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात २०१६-१७ या वर्षात दोन जबाबदार डॉक्टरांनी केवळ १५४६ रुग्ण तपासल्याची नोंद आहे. म्हणजे रोज पाचही रुग्ण तपासण्यात आलेले नाहीत. धक्कादायक म्हणजे, या रुग्णालयात पूर्णवेळ शल्यचिकित्सक असतानाही गेल्या वर्षी केवळ २३ शस्त्रक्रिया झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडलेला आहे. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात २०१६-१७ या वर्षात दोन जबाबदार डॉक्टरांनी केवळ १५४६ रुग्ण तपासल्याची नोंद आहे. म्हणजे रोज पाचही रुग्ण तपासण्यात आलेले नाहीत. धक्कादायक म्हणजे, या रुग्णालयात पूर्णवेळ शल्यचिकित्सक असतानाही गेल्या वर्षी केवळ २३ शस्त्रक्रिया झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
शहराची लोकसंख्या ३० लाखाच्यावर गेली असताना महापालिका फक्त तीन रुग्णालयांतून आरोग्य सेवा देत आहे. त्यांच्या मदतीला अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानीचे असे एकूण २९ बाह्यरुग्ण विभाग आहेत. एकीकडे मनपाचे रुग्णालय अद्ययावत करण्यावर चर्चा केली जात असताना दुसरीकडे आहे त्या सोर्इंमध्ये जास्तीत जास्त रुग्णांना कसा फायदा होईल याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने नुकतेच मनपाचे डॉक्टर रुग्णालयाच्या वेळा पाळत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. परंतु कुणावरच कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, इंदिरा गांधी रुग्णालयात ईसीजी काढणारी महिला तंत्रज्ञ चक्क रुग्णांना तपासत असल्याचे फोटोसह वृत्तही प्रसिद्ध केले होते. मनपा प्रशासनात याबाबत चर्चाही झाली, परंतु कारवाई झालेली नाही. ती महिला कर्मचारी आजही त्याच रुग्णालयात कामाला आहे. रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल चिव्हाणे व शल्यचिकित्सक प्रवीण गंटावार यांनी २०१५-१६ या वर्षामध्ये १२०६ तर २०१६-१७मध्ये १५४६ रुग्ण तपासले आहेत. डॉ. गंटावार यांनी २०१६ मध्ये केवळ २५ रुग्णांवर तर २०१७ मध्ये २३ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.
डॉक्टरांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च करणारे मनपा प्रशासन डॉक्टरांच्या कार्यपद्धतीकडेही लक्ष देईल का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.