नागपूर मनपाच्या अपूर्व विज्ञानाचा प्रवास पोहचला राज्यभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:48 PM2018-09-04T22:48:03+5:302018-09-04T22:52:07+5:30
पडक्या व मोडकळीस आलेल्या इमारती, अस्वच्छता, नीरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, अशी दुर्लक्षित भावना मनपाच्या शाळेप्रति समाजाची आहे. पण मनपाचे काही शिक्षक समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याचा मनापासून प्रयत्नात आहे. आहे त्या परिस्थितीत गुणवंत विद्यार्थी घडविता येतील, या दृष्टिकोनातून मनपाच्या तीन शिक्षिकांनी अप्रतिम कार्य केले आहे. या शिक्षिकांच्या प्रयत्नातून मनपाच्या अपूर्व विज्ञान मेळाव्याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या तीन शिक्षिकांनी राज्यभरातील विज्ञान शिक्षकांना विज्ञानाच्या अध्यापनाची दृष्टी दिली आहे. त्यांच्या प्रयत्नातून मनपाचे नाव राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पडक्या व मोडकळीस आलेल्या इमारती, अस्वच्छता, नीरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, अशी दुर्लक्षित भावना मनपाच्या शाळेप्रति समाजाची आहे. पण मनपाचे काही शिक्षक समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याचा मनापासून प्रयत्नात आहे. आहे त्या परिस्थितीत गुणवंत विद्यार्थी घडविता येतील, या दृष्टिकोनातून मनपाच्या तीन शिक्षिकांनी अप्रतिम कार्य केले आहे. या शिक्षिकांच्या प्रयत्नातून मनपाच्या अपूर्व विज्ञान मेळाव्याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या तीन शिक्षिकांनी राज्यभरातील विज्ञान शिक्षकांना विज्ञानाच्या अध्यापनाची दृष्टी दिली आहे. त्यांच्या प्रयत्नातून मनपाचे नाव राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.
सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या दीप्ती चंदनसिंग बिस्ट, दुर्गानगर हायस्कूलच्या ज्योती मिलिंद मेडपिलवार व बॅरि. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन व वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक हायस्कूलच्या पुष्पलता रवींद्र गावंडे या तीन शिक्षिका खऱ्या अर्थाने मनपासाठी आदर्श आहे. विज्ञानाच्या या तीन शिक्षिका १९९८ पर्यंत पारंपरिक पद्धतीने अध्यापनाचे कार्य करीत होत्या. परंतु सुरेश अग्रवाल यांनी राबविलेल्या विज्ञानाच्या उपक्रमातून त्यांना दृष्टी मिळाली. विज्ञान कसे शिकवावे, कसे समजून घ्यावे यातील बारकावे त्यांनी अध्यापनाचे नियमित काम करताना त्यांनी अवगत केले. आणि आपल्या कल्पकतेतून विज्ञानाचे शेकडो प्रयोग तयार केले तेही टाकावू वस्तूपासून. सोबतच विज्ञान शिकविण्याच्या पद्धतीत थोडी रंजकता आणली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति गोडी निर्माण झाली. हळुहळू शाळेशाळेतून विद्यार्थी जुळू लागले. यातून अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना रुजली. ‘नो कॉस्ट, लो कॉस्ट’, ‘लॅब इन कॅरिबॅग’ या संकल्पना त्यांनी आपल्या कल्पकतेने फुलविली. दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळाव्या या शिक्षिकांच्या नेतृत्वात साजरा होऊ लागला. २०१५ मध्ये या मेळाव्याला तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार व शिक्षण विभागाच्या तत्कालीन ओएसडी प्राची साठे यांनी भेट दिली. चार तास त्यांनी मेळाव्यात घालविले. विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे निरीक्षण केले. शिक्षकांशी चर्चा केली. अपूर्व विज्ञान मेळाव्याची ही संकल्पना राज्यभर राबविण्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये शासन निर्णय काढला. तेव्हापासून राज्यभरातील शाळांमध्ये मनपाचा अपूर्व विज्ञान मेळावा साजरा होत आहे.
यांची प्रयोगशाळा वर्गात येते
विज्ञानाची प्रयोगशाळा म्हटले की काचेची उपकरणे, मायक्रोस्कोप, विज्ञानाच्या प्रयोगाचे साहित्य असे चित्र डोळ्यापुढे येते. परंतु या शिक्षिकांनी तयार केलेली प्रयोगशाळा कॅरीबॅगमध्ये येते. एरवी प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जावे लागतात. परंतु या शिक्षिकांनी तयार केलेली प्रयोगशाळा वर्गात घेऊन जाता येते. ‘लॅब इन कॅरीबॅग’ अशी ती संकल्पना आहे.
खेळण्यातून सांगतात विज्ञानाचे सिद्धांत
भौतिकशास्त्राचा जडत्वाचा सिद्धांत थेअरीमध्ये दोन पानांचा आहे. बरेचदा वाचल्यानंतरही तो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही. पण एक पेन्सिल आणि रुपयाच्या कलदारवर इतक्या सहजपणे सांगितल्या जातो की विद्यार्थी आयुष्यभर विसरू शकत नाही. संवेग अक्षयतेचा सिद्धांत खेळण्यातील कंच्याद्वारे विद्यार्थ्यांना शिकविला जातो. असे ३०० हून अधिक विज्ञानाचे सिद्धांत या शिक्षिकांनी प्लास्टिक बॉटल, झाकण, कागद, खेळणी, सिरींज, रिकाम्या रिफील, पेन, सेल, टायर, हेअर पिन या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे मांडले आहेत.
पाठ्यपुस्तक मंडळाने घेतली दखल
शासनाने ज्ञानरचना वाद ही संकल्पना २०१० मध्ये रुजविली. परंतु या शिक्षिका २००० पासून मनपाच्या शाळेत त्या संकल्पनेवर काम करीत होत्या. शासनाने त्यांच्या कल्पकतेची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरावर रिसोर्स पर्सन म्हणून निवड केली. पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांच्या प्रयोगांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला. या शिक्षिकांच्या मार्गदर्शनात मनपाच्या विद्यार्थ्यांचे विज्ञानाचे मॉडेल सातत्याने राष्ट्रीय स्तरावर निवडले जात आहे.