नागपुरात नगरसेविकेने उधळला नवऱ्याचा ‘व्हॅलेंटाईन डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 08:39 PM2018-02-14T20:39:52+5:302018-02-14T20:49:39+5:30
प्रेमाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, ते नैतिक मर्यादेत हवे. प्रेमाच्या नावावर कुणी नैतिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ हा घडणारच. असाच प्रकार बुधवारी छत्रपती चौकात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, ते नैतिक मर्यादेत हवे. प्रेमाच्या नावावर कुणी नैतिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ हा घडणारच. असाच प्रकार बुधवारी छत्रपती चौकात घडला. विवाहित असूनही प्रेयसीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करायला निघालेल्या एका तरुणाला त्याच्या नगरसेविका असलेल्या पत्नीने रंगेहात पकडून दोघांनाही चांगलीच अद्दल घडवली.
भाजपाच्या एका नगरसेविकेला गेल्या काही महिन्यांपासून तिच्या नवऱ्याचे बाहेर प्रेमप्रकरण असल्याची शंका होती. मात्र पुरावा काही सापडत नव्हता. अशातच व्हॅलेंटाईन डे आला. या दिवशी आपला पती प्रेयसीला भेटणार असा ठाम अंदाज या नगरसेविकेला होता. म्हणून ती सकाळपासूनच पतीच्या पाळतीवर होती. गिट्टीखदान येथील घरातून पती बाहेर पडताच पत्नीही गाडीने त्याचा पाठलाग करू लागली. अखेर पती छत्रपती चौकात थांबला. येथे त्याची प्रेयसी आधीपासून वाट बघत होती. पती प्रेयसीला गुलाबाचे फूल व भेटवस्तू देणार तोच नगरसेविका पत्नीने चंडिकेचे रूप धारण करीत नवरा व त्याच्या प्रेयसीला चांगलाच चोप दिला. यावेळी पतीनेही विरोध केल्याने दोघात थोडावेळ झटापट झाली.
गोंगाटामुळे थोड्याच वेळात बघ्याची गर्दी जमली. प्रेमप्रकरणाचा भंडाफोड झाल्याने पतीराज गोंधळले. प्रसंगावधान राखून बदनामीच्या भीतीने त्याने लगेच येथून काढता पाय घेतला. पतीपाठोपाठ पत्नीही लगेच निघून गेली. मात्र नगरसेविके ने पतीला चोप दिल्याची चर्चा थोड्याच वेळात शहरात पसरली. माहिती जाणून घेण्यासाठी अनेकांनी प्रभाग ३५ व प्रभाग ३६ मधील भाजपाच्या नगरसेवकांशी संपर्क साधला, परंतु शोध लागत नव्हता. मात्र काही प्रत्यक्षदर्शींनी नगरसेविका गिट्टीखदान भागातील असल्याचे सांगितले. वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी या संदर्भात संपर्क साधला असता नगरसेविके च्या पतीने असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. बदनामीच्या भीतीने या संदर्भात पोलीस स्टेशनलाही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.
शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रातील भाजपा नगरसेवकांच्या मंगळवारी बैठकी घेण्यात आल्या. यात नगरसेवकांना आपले आचरण सुधारण्याचा सल्ला दिला गेला असतानाच दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा आहे.