नागपुरात नगरसेवकांना आली जाग; फॉगिंग मशीनसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 09:50 PM2018-09-18T21:50:25+5:302018-09-18T21:52:10+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार १५१ नगरसेवकांना स्वच्छतेसाठी काय केले अन् काय करू इच्छिता याबाबतचे शपथपत्र दाखल करावयाचे असल्याने नगरसेवकांना जाग आली आहे. प्रभागात औषध फवारीसाठी फॉगिंग मशीन उपलब्ध व्हावी, म्हणून त्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येक प्रभागासाठी दोन छोट्या फॉगिंग मशीन तातडीने उपलब्ध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता आरोग्य विभागाकडून तातडीने फॉगिंग मशीन उपलब्ध होण्याची शक्यता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार १५१ नगरसेवकांना स्वच्छतेसाठी काय केले अन् काय करू इच्छिता याबाबतचे शपथपत्र दाखल करावयाचे असल्याने नगरसेवकांना जाग आली आहे. प्रभागात औषध फवारीसाठी फॉगिंग मशीन उपलब्ध व्हावी, म्हणून त्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येक प्रभागासाठी दोन छोट्या फॉगिंग मशीन तातडीने उपलब्ध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता आरोग्य विभागाकडून तातडीने फॉगिंग मशीन उपलब्ध होण्याची शक्यता नाही.
गेल्या काही महिन्यात शहरातील सर्वच भागात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. डेंग्यू व स्क्रब टायफसचे रुग्ण वाढले आहेत. असे असूनही अनेक नगरसेवक त्यांच्या प्रभागात फिरकत नव्हते. शपथपत्रात स्वच्छतेबाबत केलेल्या कामाची माहिती द्यावयाची असल्याने नगरसेवकांना जाग आली आहे. आरोग्य विभागाकडे पाच मोठ्या फॉगिंग मशीन आहेत. महिन्यातून एकदा प्रत्येक प्रभागात फॉगिंग करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मागणी करूनही या मशीन उपलब्ध होत नाही. तसेच २० हॅन्ड फॉगिंग मशीन आहेत. ज्या वस्त्यात मोठी फॉगिंग मशीन वापरणे शक्य नाही, अशा भागात या मशीनचा वापर केला जातो. मोठी मशीन उपलब्ध होत नसल्याने प्रत्येक प्रभागासाठी दोन छोट्या फॉगिंग मशीन उपलब्ध करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
प्रभागातील नाल्या व गडर लाईन तुंबल्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणारे नगरसेवक सेवेसाठी तत्पर झाले आहेत. तक्रार येताच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सफाई कामगार उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे. प्रभागात न दिसणाऱ्या नगरसेवकांच्या दर्शनाची नागरिकांत उलटसुलट चर्चा आहे.
स्वच्छतेच्या फोटोचे संकलन
स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात सहभागी नगरसेवक हातात झाडू घेतल्याचे फोटो शोधत आहेत. प्रभागात राबविलेले स्वच्छता अभियान, नाल्या दुरुस्ती याचे फोटो संकलन करून शपथपत्रासोबत जोडणार आहेत. मात्र अशा नगरसेवकांची संख्या मोजकीच आहे. अनेक जण महापालिक निवडणुकीनंतर प्रभागात फिरकलेले नाहीत. अशा नगरसेवकांना शपथपत्रात कोणती माहिती द्यावी, असा प्रश्न पडला आहे. आपसात याबाबत चर्चा सुरू आहे. कुणी शपथपत्र बनविले का, याचा शोध घेत आहेत. दुसऱ्याच्या शपथपत्राची कॉपी करून सादर करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे.