चौकार मारणाऱ्या नगरसेवकांना पाचव्यांदा नशीब देणार का साथ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 11:22 AM2022-02-16T11:22:44+5:302022-02-16T11:28:02+5:30
२०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग होता. आता तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होत आहे.
गणेश हूड
नागपूर : निवडणूक नजीक आल्याने महापालिका वर्तुळात सध्या ‘लंबी रेस का घोडा ’असलेल्यांची चर्चा आहे. सलग चारवेळा निवडून आलेले पाच नगरसेवक आता पुन्हा पाचव्यांदा नशीब आजमावणार का, याची उत्सुकता आहे, तर सलग तीनवेळा निवडून आलेले सात नगरसेवक चौकार मारून पुन्हा मनपा सभागृहात एन्ट्री करणार का? याची उत्सुकता आहे.
एक सदस्यीय वॉर्ड, कधी दोन, तर कधी तीन सदस्यीय पध्दतीने निवडणुका झाल्या. २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग होता. आता तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होत आहे. प्रभाग रचना बदलली तरी भाजपचे आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, संदीप सहारे व सतीश होले दोन दशकांपासून नगरसेवक आहेत.
प्रवीण दटके आमदार असल्याने मनपा निवडणूक लढणार नाहीत, तर संदीप जोशी यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. यामुळे ते लढणार की नाही. याबाबत संभ्रम आहे. मात्र, प्रफुल्ल गुडधे, सतीश होले व संदीप सहारे तयारीला लागले आहेत. पुढील निवडणुकीत त्यांना मतदारांनी कौल दिल्यास सलग पाचवेळा नगरसेवक राहण्याची संधी मिळेल.
सात जण मारणार का चौकार ?
महापालिका सभागृहात सलग चार वेळा निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना वगळता सात जण चौकार मारणार का, याची उत्सुकता आहे. यात माजी महापौर माया इवनाते, बाल्या बोरकर, प्रगती पाटील, राजेश घोडपागे, प्रवीण भिसीकर, अविनाश ठाकरे, किशोर कुमेरिया आदींचा समावेश आहे, तर काही दोनवेळा नगरसेवक असलेल्यांना आरक्षणामुळे निवडणूक लढता आली नाही. यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींना नगरसेवक होण्याचा मान मिळाला .
दोन दशकात २० नगरसेवक वाढले
सन २००७च्या महापालिका निवडणुकीत १३६ नगरसेवक होते. वॉर्ड पध्दतीने ही निवडणूक लढण्यात आली. २०१२च्या निवडणुकीत १४५ नगरसेवक झाले. ही निवडणूक दोन सदस्यीय पध्दतीने झाली होती. २०१७च्या निवडणुकीत १५१ नगरसेवक झाले. चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक झाली, तर २०२२च्या निवडणुकीत १५६ नगरसेवक राहणार असून, तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीने ही निवडणूक होणार आहे.