नागपूर मनपाची अग्निशामक सेवा महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:59 AM2019-08-02T11:59:51+5:302019-08-02T12:01:53+5:30

नागपूर शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशामक विभागाला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहेत.

Nagpur municipal fire service will be expensive | नागपूर मनपाची अग्निशामक सेवा महागणार

नागपूर मनपाची अग्निशामक सेवा महागणार

Next
ठळक मुद्देएनओसी ते बंदोबस्त शुल्कात वाढअग्निशामक विभागाने दिला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशामक विभागाला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहेत. विभागाच्या सक्षमीकरणासोबतच बहुमजली इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र, विहिरींची सफाई, इमारतींची पाहणी, पाणीपुरवठा, प्रशिक्षण आदी शुल्कामध्ये दीड ते दोन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव अग्निशामक विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. २ ऑगस्टला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून ही मागणी सुरू होती.
प्रस्तावानुसार, एनओसीसाठी इमारत अग्निशमन सेवा शुल्कांतर्गत नकाशाच्या तपासणीचे शुल्क दोन टक्के ठेवले आहे. तर, इमारत सूचनापत्राच्या नुतनीकरण प्रमाणपत्राचे शुल्क दोन हजार रुपयांवरून वाढवून तीन हजार रुपये केले आहे. परिपूर्णता प्रमाणपत्र शुल्क दोन हजारांवरून १० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. यात, १५० वर्गमीटरपेक्षा अधिक मोठ्या व्यावसायिक इमारतीसाठी १० हजार रुपये तसेच निवासीसाठी पाच हजार रुपये आकारले जातील. इमारतीचा वार्षिक अग्निशामक शुल्क एक टक्का कायम ठेवले जाणार आहे. उद्योगासाठी फायर फिटनेस प्रमाणपत्र शुल्क अडीच हजार रुपयांवरून तीन हजार रुपये आणि अस्थायी बांधकाम, समारंभ, मंडप, प्रदर्शन, सर्कस, संमेलनासाठी अडीच हजारांवरून तीन हजार रुपये केले जाणार आहे.
खासगी विहिरींच्या सफाईसाठी पूर्वी सहा तासासाठी ५०० रुपये घेतले जायचे. आता तीन तासासाठी ५०० रुपये शुल्क प्रस्तावित आहे. नंतरच्या प्रत्येक तासासाठी २०० रुपये अतिरिक्त घेतले जातील. मलवाहिनी, नालीचे लिकेज, अन्य कारणांमुळे विहिरींचे पाणी दूषित झाल्यास शुल्क घेतले जाणार नाही. अग्निशमन बंदोबस्त आठ तासासाठी वाहन व कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी चार हजार रु पये व प्रती तास ५०० रुपये आकारले जायचे. हे शुल्क आता सहा हजार रुपयापर्यंत वाढविले जाणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी साडेचार ते पाच हजार लिटर क्षमतेच्या फायर टेंडरचा दर ५०० रुपयांवरून १००० रुपये, १० हजार लिटर क्षमता (पंपासह) टेंडरसाठी भाडे १२०० वरून २००० रुपये, १० हजार लिटर क्षमतेच्या टेंडरसाठी (पंपाशिवाय)८०० रुपयांवरून १५०० रुपये दर ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

फायर ऑडिटसाठी आता तीन हजार रुपये
मनपा सीमाक्षेत्राबाहेर अग्निशामक दलाचे वाहन बचाव कार्यासाठी जात असेल तर यापुढे प्रति किमी ४० रुपये भाडे आकारले जाईल. आधी आठ तासांसाठी दोन हजार रुपये दर होता. पंपिंग चार्ज ५०० रुपये होता. टीटीएलचे भाडे प्रति तास चार हजार रुपये निर्धारित केले आहेत. फायर ऑडिटसाठी तीन हजार रुपये, प्रशिक्षणासाठी प्रती व्यक्ती प्रती माह एक हजार रुपये, वॉटर रेस्क्यूकरिता प्रती तासाला ५०० रुपयांवरून एक हजार रुपये आकारणी करण्याचा प्रस्ताव आहे. फटाके, मूर्ती दुकान तसेच अन्य अस्थायी दुकानांसाठी एनओसी घेण्यासाठी दोन हजार रुपये दर आकारला जाईल.

Web Title: Nagpur municipal fire service will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.