वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी नागपूर मनपाची हेल्पलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:08 PM2020-04-04T12:08:54+5:302020-04-04T12:09:22+5:30
अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कुणाचाही आधार नसलेल्या एकाकी दिव्यांग व्यक्तींना लॉकडाऊन परिस्थितीत घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कुणाचाही आधार नसलेले एकाकी राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी नागपूर महापालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. अशा व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास त्यांनी सदर हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कुणाचाही आधार नसलेल्या एकाकी दिव्यांग व्यक्तींना लॉकडाऊन परिस्थितीत घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गरजू व्यक्तीने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही सेवा उपलब्ध होऊ शकेल. इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्था, दिव्यांग क्षेत्रात काम करणाºया संस्था यांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याची इच्छा दर्शविल्यास हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
येथे साधा संपर्क
- मनपाने सुरू केलेल्या या हेल्पलाईनचा क्रमांक ०७१२-२५६७०१९ असा असून संपर्क अधिकारी (नोडल आॅफिसर) म्हणून अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. अन्नधान्य, औषध, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.