नागपूर मनपा रुग्णालयात मोहीम; रुबेला लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:31 PM2019-03-19T13:31:56+5:302019-03-19T13:32:28+5:30
मागील काही महिन्यांपासून महापालिकेतर्फे गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र साडेसहा लाख बालकांचे उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याने लाखो बालके लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही महिन्यांपासून महापालिकेतर्फे गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. महापालिकेसह खासगी शाळांमध्येही मोहीम राबविण्यात आली. मात्र साडेसहा लाख बालकांचे उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याने लाखो बालके लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवारी महापालिके च्या आरोग्य विभागातर्फे पुन्हा मनपा २१ दवाखाने व ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागाने ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी २७ नोव्हेंबर २०१८ पासून गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. शहरातील सर्वच शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
शासकीय सुटीचे दिवसवगळता ३० दिवसांत शहरातील ६ लाख ४२ हजार ४८५ बालकांना गोवर, रुबेलाची लस देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. मात्र साडेपाच लाख बालकांचेच उद्दिष्ट गाठण्यात आले. अद्यापही अनेक शाळांतील मुले या लसीकरणापासून वंचित आहेत. काही शाळांमध्ये ही मोहीम शंभर टक्के यशस्वी झाली. परंतु अनेक शाळांतील विद्यार्थी या लसीपासून वंचित आहते.
या वंचित बालकांच्या पालकांनी महापालिकेचे दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
गोवर-रुबेला लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज पसरविण्यात आले. त्यामुळे अनेक मुले या लसीपासून वंचित आहेत. विशेषत: मुस्लीम शाळांमध्ये ही मोहीम अपयशी ठरली.
स्कूल आॅफ स्कॉलर्स, अत्रे लेआऊट, माऊंट कारमेल स्कूल धंतोली, लक्ष्मीदेवी धीरनकन्या विद्यालय बर्डी, दारूल उलूम मुफ्ती मदरसा संघर्षनगर, मदरसा मरकजे इल्म झाकिया लीलबनात सल्फीयाबाद, आदर्श हिंदी हायस्कूल गोधनी रोड यासह अनेक शाळांमध्ये ही मोहीम यशस्वी ठरली होती. परंतु अद्यापही लक्ष्य पूर्ण न झाल्याने ३० दिवसांच्या या मोहिमेचा कालावधी आणखी वाढविण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.