नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:17 PM2019-10-31T22:17:23+5:302019-10-31T22:19:41+5:30

रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या.

Nagpur Municipal Transport Department: 21Thousands of buses have been out of order in two and a half years | नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या

नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या

googlenewsNext
ठळक मुद्देनादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात : मनपाचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी स्कुटीस्वार तरुणी गंभीर जखमी झाली. दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या आपली बसेसची देखभाल, दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट असून यामुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
बस बंद पडण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे ब्रेक फेल होण्याच्या घटना घडत आहे. यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असूनही परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
महापालिकेने शहर बससेवेसाठी तीन ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडेच आपली बसच्या देखभाल व दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. परंतु त्याकडे ऑपरेटरचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज अचानक बस बंद पडणे, ब्रेक फेल सारख्या घटना होत आहेत. या महिन्यात महापालिका परिवहन विभागाकडील नोंदीनुसार ९४१ ठिकाणी विविध कारणाने रस्त्यांवरच बस बंद पडली, अर्थात दररोज वेगवेगळ्या मार्गावर ३१ ठिकाणी बस अचानक बंद पडत आहे किंवा ब्रेक फेल होत आहेत. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर, या सहा महिन्यात ४ हजार ८५४ ठिकाणी बस अचानक बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
जुनमध्ये ७०९ जुलैमध्ये ८६१ आणि ऑगस्टमध्ये ९१० ठिकाणी विविध रस्त्यांवर बस अचानक बंद पडल्या. त्यामुळे तिकिटसाठी पैसे खर्च करूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरात दररोज दीड लाख प्रवासी 'आपली बस'ने प्रवास करतात. आपली बसची सेवा उत्तम असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु देखभाल, दुरुस्तीअभावी प्रवाशांच्या सुरक्षेची कुठलीही खात्री नाही. मागील दोन वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
शहरात ३८० बसेस दररोज धावत आहेत. यातील २०० बस दहा वर्षे जुन्या आहेत. या बसमुळे प्रदूषण वाढत असून आतील आसनेही बसण्यास योग्य नाहीत. याशिवाय बसच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका आहे.

दंड आकारला जातो पण वसुली नाही
बस फेऱ्या कमी झाल्या, उशिरा बस सुटली, बस बंद ठेवल्यास संबंधित ऑपरेटला दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार अनेकदा दंड आकारला जातो. पण वसुली कुठे दिसत नाही. यात पडद्याआड तडजोड होत असल्याने नादुरुस्त बसची संख्या वाढली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे.

सभापतींच्या भूमिके वर प्रश्नचिन्ह
शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी. याची जबाबदारी महापालिकेच्या परिवहन विभागाची आहे. परंतु बसची अवस्था, नादुरूस्त बसमुळे होणारे अपघात याचा विचार करता या विभागावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत. परिवहन सभापती यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बसेस बंद पडल्याच्या घटना
वर्ष             घटना
२०१७-१८    ९२६०
२०१८-१९     ७५०८
२०१९-२०(सप्टेंबरपर्यत) ५,८५४

 

Web Title: Nagpur Municipal Transport Department: 21Thousands of buses have been out of order in two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.