नागपुरात प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:33 PM2019-03-30T12:33:01+5:302019-03-30T12:34:25+5:30

प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या एका १६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह तिघांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील पाण्याच्या टाक्यात फेकून दिला. कोणताही धागादोरा नसताना नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चिपडी (कुही) गावातील तिघांना अटक केली.

In Nagpur, the murder of a child who was kidnapped in connection with love affairs | नागपुरात प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या मुलाची हत्या

नागपुरात प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या मुलाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देनंदनवन पोलिसांनी लावला छडा कुहीजवळच्या तीन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या एका १६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह तिघांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील पाण्याच्या टाक्यात फेकून दिला. कोणताही धागादोरा नसताना नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चिपडी (कुही) गावातील तिघांना अटक केली. रोहित शांताराम रंगारी (वय १६) असे मृत मुलाचे तर, त्याची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे शानू ईकबाल शेख (वय २२), विक्की ऊर्फ विराज मधुकर पाटील (वय १९) अशी असून, यात आणखी एका अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश आहे. मृत आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. या खळबळजनक प्रकरणाची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण उपस्थित होते.
रोहितने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. आरोपी शानूचे चपलेचे दुकान असून, दुसरा आरोपी विक्की कुलर दुरुस्तीचे काम करतो. रंगारीच्या बहिणीसोबत गावातीलच आरोपी शानू शेख याचे प्रेमसंबंध होते. ते माहीत पडल्याने रोहित शानूचा राग करायचा. त्याने बहिणीलाही दम दिला होता. शानूला भेटल्यास गंभीर परिणाम होतील,असे म्हटले होते. चिपडी छोटेसे गाव आहे. प्रेयसीचा भाऊ विरोधात गेल्याने शानूच्या प्रेमसंबंधात अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे शानू संतप्त झाला. त्याने त्याचा मित्र विक्की पाटील आणि एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने रोहित रंगारीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार, आरोपी शानूने विक्कीच्या माध्यमातून रंगारीला नागपुरात पार्टी करू म्हणून हट्ट धरला. त्यानुसार, २२ मार्चला रात्री दुचाकीने विक्की व अन्य एका आरोपीसोबत रंगारी नागपुरात आला. शानूही मागून आला. हे सर्व मोमीनपुऱ्यात गेले. तेथे त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण घेतले.
जेवण घेतल्यानंतर मोमीनपुºयातून आरोपींनी रोहित रंगारीला विक्कीचा अंतुजीनगरातील चुलत भाऊ आशिष पाटील याच्या रूमवर नेले. तेथे आरोपींनी रोहित रंगारीला बेदम मारहाण केली. त्यानंतर वाठोड्याजवळच्या डम्पिंग यार्डमध्ये नेले. तेथे शानूने रंगारीच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला चढवून त्याला ठार मारले आणि त्याचा मृतदेह सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये फेकून आरोपी पळून गेले. २४ मार्चला रात्रीच्या वेळी तेथील कर्मचाऱ्यांना मृतदेह पाण्यावर दिसल्याने कर्मचाºयांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नंदनवन पोलिसांना कळविले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.

असा मिळवला धागा
डॉक्टरांनी मृताच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याचा तसेच हा हत्येचा प्रकार असल्याचे नंदनवन पोलिसांना सांगितले. ठाणेदार चव्हाण यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त रौशन यांना दिली. मृताची ओळख पटविणारे कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे डीडीपी रौशन यांनी ठाणेदार चव्हाण. पोलीस निरीक्षक अरविंद भोळे आणि त्यांच्या सहकाºयांना शहर तसेच जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची यादी मागवून घ्यायला सांगितली. पोलिसांना मिळालेल्या यादीत कुहीतून २२ मार्च २०१९ पासून बेपत्ता झालेल्या रोहित रंगारीचे वर्णन मिळतेजुळते वाटल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यांनी तो मृतदेह रोहित रंगारीचाच असल्याचे सांगितले.

आरोपीचे मदत करण्याचे नाटक
मृताची ओळख पटल्याने पोलिसांचा तपासाचा मार्ग सोपा झाला. पोलिसांनी गुन्ह्याच्या दिवशी तो कुणासोबत होता. डम्पिंग यार्ड परिसरात २२ मार्चला कुणाचे लोकेशन दिसते, ते तपासले. त्या आधारे पोलिसांनी शानू आणि विक्की तसेच अन्य एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. या तिघांवर प्रश्नांची सरबत्ती करताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच घटनाक्रमही उलगडला. विशेष म्हणजे, रोहित रंगारी गावातून एकाएकी बेपत्ता झाल्यामुळे त्याचे नातेवाईक आणि वस्तीतील मंडळी त्याचा इकडेतिकडे शोध घेऊ लागले. यावेळी आरोपी शानूदेखील आपल्या मोबाईलवर रोहित रंगारीचा फोटो दाखवून त्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे नाटक करीत होता, असे एका प्रश्नाच्या उत्तरात रौशन यांनी पत्रकारांना सांगितले.कोणताही पुरावा नसताना या हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्याची कामगिरी उपायुक्त रौशन, सहायक आयुक्त घार्गे, सहायक आयुक्त धोपावर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण, निरीक्षक अरविंद भोळे आणि त्यांच्या सहकाºयांनी बजावली.

Web Title: In Nagpur, the murder of a child who was kidnapped in connection with love affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून