नागपुरात डीजेवर नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 10:51 PM2019-05-22T22:51:00+5:302019-05-22T22:53:19+5:30
डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.
मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास अजनीतील धोबी घाट चौकाजवळ ही थरारक घटना घडली. आशुतोष बाबुलाल वर्मा (वय २५, रा. नवीन बाबुलखेडा, धोबी घाट) असे मृत तरुणाचे तर, शुभम नलिन कांबळे (वय २३) असे जखमीचे नाव आहे.
बुधवारी २० मे रोजी रामटेक येथे मित्राच्या लग्नात आशुतोष अन्य मित्रांसह गेला होता. तेथे डीजेवर नाचताना ललित ऊर्फ काल्या प्रवेश प्रजापती (वय १९) आणि मनीष ऊर्फ मंशा अशोक रवतेल या दोघांना आशुतोषचा धक्का लागला. या कारणावरून आशुतोषचा ललित तसेच मंशासोबत वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. ललित आणि मंशाने त्याला नागपुरात चल तुझा गेम वाजवतो, अशी धमकी दिली.
मंगळवारी सायंकाळी लग्नानंतर रिसेप्शनच्या कार्यक्रमात आशुतोषचा शुभम कटोतेसोबत पुन्हा वाद झाला. त्यावेळी तो कसाबसा सुटला. जेवण झाल्यानंतर आशुतोष घरी गेला. शुभमने आशुतोषला फोन केला. एक मॅटर सलटाने का है, जल्दी चौक मे आ’ असे म्हणत आशुतोषला बोलावून घेतले. तिकडे त्याने ललित आणि मंशा तसेच अन्य आरोपींना आशुतोषला बोलावल्याचे सांगितले. आशुतोष त्याचा मित्र शुभमला घेऊन धोबी घाट चौकात गेला. तेथे शुभम आणि ललित, मंशा, विनू मेश्राम आणि अन्य दोन आरोपी शस्त्र घेऊन होते. एकाने आशुतोषच्या गळ्यात हात घालून त्याला धोबीघाटाकडे नेले. अंधारात नेल्यानंतर आरोपींनी आशुतोषवर प्राणघातक हल्ला चढवला. ते पाहून शुभम कांबळे मदतीला धावला असता आरोपींनी त्यालाही जखमी केले. आशुतोषला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेले. शुभमने त्याच्या मित्रांना फोन करून तेथे बोलावून घेतले. त्या सर्वांनी आशुतोषला मेडिकलला नेले. तेथे उपचारादरम्यान आशुतोषचा मृत्यू झाला. एकुलत्या एका मुलाची हत्या झाल्याने आशुतोषच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.
त्याची धडपड व्यर्थ
मित्राला रक्ताच्या थारोळ्यात लोळविणाऱ्या आरोपींना तातडीने अटक व्हावी म्हणून शुभम जखमी अवस्थेतच अजनी ठाण्यात पोहचला. आरोपींना तातडीने अटक करा, अशी विनंती त्याने पोलिसांना केली. मात्र, त्याची धडपड व्यर्थ ठरली. पोलिसांनी वेळकाढू धोरण अवलंबले. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यास वेळ मिळाला. दरम्यान, आशुतोषच्या हत्येच्या आरोपात अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दोघांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.