नागपुरात काँग्रेसची उमेदवारी नाना पटोलेंना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 08:22 PM2019-03-08T20:22:46+5:302019-03-08T20:26:52+5:30
भाजपाचे ‘हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरात काँग्रेस कुणाला रिंगणात उतरविते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांचे नाव हायकमांडने फायनल केले असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दिल्लीत दिवसभर चाललेल्या घडामोडीनंतर छाननी समितीने पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. मात्र, काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडून यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे ‘हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरात काँग्रेस कुणाला रिंगणात उतरविते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांचे नाव हायकमांडने फायनल केले असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दिल्लीत दिवसभर चाललेल्या घडामोडीनंतर छाननी समितीने पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. मात्र, काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडून यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.
२०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. मुत्तेमवार यापूर्वी नागपुरातून चार वेळा विजयी झाले होते. मात्र, गेल्यावेळच्या पराभवानंतर पक्षाने नवा चेहरा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आली होती. शेवटी मुत्तेमवार यांनी एक पाऊल मागे सरत पटोले यांचे नाव समोर केले होते. असे असले तरी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचेही नाव अखेरपर्यंत दिल्लीत चर्चेत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुत्तेमवार गटाने पटोले किंवा ठाकरे अशी भूमिका घेतली होती तर अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी गुडधे यांच्या नावाला पसंती दिली. दरम्यान, पटोले यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी व महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत नागपुरातून लढण्याची तयारी दर्शविली. यानंतर झालेल्या पक्षाच्या छाननी समितीच्या बैठकीत पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा पटोले समर्थकांनी केला आहे. काँग्रेसमध्ये अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीच खरे नसते याची जाणीव असल्यामुळे पटोले यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. आपण छाननी समितीला आपला होकार कळविला आहे, प्रदेश प्रभारी खरगे यांच्याशी बोलणे झाले आहे, पक्षाने आदेश दिला तर लढण्यास सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.
पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर उघड टीका करीत भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे त्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभेची जागाही भाजपाला गमवावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. तेव्हापासून पटोले हे सातत्याने भाजपा नेत्यांना लक्ष्य करीत नागपुरातून लढण्यास सज्ज असल्याचे सांगत होते.
हायकमांडने शोधला गटबाजीवर उपाय
नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीमुळे हायकमांडही त्रस्त आहे. गेल्या महिन्यात मुत्तेमवार व सतीश चतुर्वेदी या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची शिष्टमंडळे दिल्लीत धडकली होती. एका गटाला उमेदवारी दिली तर दुसऱ्या गटाकडून विरोध होण्याची शक्यता पाहता हायकमांडने पटोले यांच्या रुपात तिसरा उमेदवाराचा पर्याय काढला, अशी चर्चा आहे. मात्र, पटोले यांनी सुरुवातीलाच मुत्तेमवारांचा हात धरल्यामुळे चतुर्वेदी-राऊत-अहमद गट काय भूमिका घेतो, याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे.