नागपूरला हवी ब्रॉडगेज मेट्रो, नव्या रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 07:00 AM2022-02-01T07:00:00+5:302022-02-01T07:00:12+5:30

Nagpur News सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागून नागपुरातून ब्रॉडगेज रेल्वे तसेच विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur needs broad gauge metro, new trains | नागपूरला हवी ब्रॉडगेज मेट्रो, नव्या रेल्वेगाड्या

नागपूरला हवी ब्रॉडगेज मेट्रो, नव्या रेल्वेगाड्या

googlenewsNext
ठळक मुद्देरखडलेले प्रकल्प व थर्ड आणि फोर्थ लाईनचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे

 

नागपूर : देशाचा अर्थसंकल्प आज, १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वे बजेटही जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागून नागपुरातून ब्रॉडगेज रेल्वे तसेच विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि फोर्थ लाईनची घोषणा आठ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. थर्ड आणि फोर्थ लाईनच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागपूर विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्यासाठी थर्ड आणि फोर्थ लाईनचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या मार्गासाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद करण्याची गरज आहे.

नागपूरवरून ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०२० मध्ये केली होती. परंतु, अद्यापही ब्रॉडगेज मेट्रो चालविण्याबाबत निर्णय झालेला नाही. ब्रॉडगेज मेट्रो सुरू झाल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांची सुविधा होणार आहे. त्यामुळे अमरावती, बडनेरा, चंद्रपूर, बुटीबोरी, आमला, काटोल येथे ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. नागपूर रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लास स्टेशन म्हणून विकास करण्याची घोषणा पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. त्यानुसार इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनकडे हे काम सोपविण्यात आले. परंतु, अद्यापही नागपूरला वर्ल्ड क्लास स्टेशन करण्याबाबत पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात विदर्भातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची आणि नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा आहे.

या आहेत मागण्या

-वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गाच्या कामाला गती

-नागपूर-सेवाग्राम थर्ड, फोर्थ लाईनच्या कामाला गती

-नागपूर स्टेशनचा वर्ल्ड क्लास स्टेशन म्हणून विकास

-बडनेरा येथे कोच तयार करण्याचा कारखाना सुरू करावा

-नागपूर-नागभीड ब्रॉडगेज लाईन सुरू करावी

-इतवारीला पीट लाईन सुरू करावी

-बिलासपूर-नागपूर दरम्यान १६० किलोमीटर वेगाने गाड्या धावणे

-अजनी रेल्वेस्थानकावरून नव्या रेल्वेगाड्या सुरू कराव्यात

नव्या रेल्वेगाड्यांची गरज

नागपूरवरून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, तिरुपती, त्रिवेंद्रम येथे थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु, आतापर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या अर्थसंकल्पात नागपूरवरून विविध शहरात थेट रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.

रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत

‘अर्थसंकल्पात विदर्भातील रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत ही अपेक्षा आहे. याशिवाय नागपूरवरून नवी दिल्ली, त्रिवेंद्रम, कोलकाता, बंगळुरू, गुजरात येथे थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे.’

-प्रवीण डबली, माजी झेड आरयुसीसी सदस्य, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

............

Web Title: Nagpur needs broad gauge metro, new trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.