नागपूर मनपा व नासुप्रच्या वादात विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:18 PM2018-12-04T23:18:42+5:302018-12-04T23:23:31+5:30
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमित व विकसित केलेल्या १५४ अभिन्यासांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याला नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यातील काही अभिन्यास हस्तांरण करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. परंतु २३३ व १५४ अभिन्यासांना अद्याप मंजुरी दिलेली नाही. महापालिका व नासुप्रच्या वादात या अभिन्यासातील शेकडो वस्त्यांतील कामांना मंजुरी मिळत नसल्याने विकास रखडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमित व विकसित केलेल्या १५४ अभिन्यासांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याला नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यातील काही अभिन्यास हस्तांरण करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. परंतु २३३ व १५४ अभिन्यासांना अद्याप मंजुरी दिलेली नाही. महापालिका व नासुप्रच्या वादात या अभिन्यासातील शेकडो वस्त्यांतील कामांना मंजुरी मिळत नसल्याने विकास रखडला आहे.
१९०० व ५७२ अभिन्यास नासुप्रने महापालिकेला नागरी सुविधांची देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केले. २०११ मध्ये महापालिकेने सदर अभिन्यास हस्तांतरण करून घेतले. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गतकाळात महापालिकेने अशा अभिन्यासात रस्ते, गडरलाईन, नळाच्या लाईन टाकल्या. या आता या भागातील रस्ते दुरुस्तीला आलेले आहेत. गडरलाईन व पाईपलाईन दुरुस्तीला आलेल्या आहेत.
अभिन्यासातील विकास कामांसाठी स्थायी समितीने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. नासुप्रने हस्तांतरित केलेल्या परंतु महापालिकेने अद्याप हस्तांतरणाला मंजुरी न दिलेल्या २३३ व १५४ अभिन्यासातील विकास कामांच्या फाईल्स बांधकाम विभागाने रोखल्या आहेत. गतकाळात या अभिन्यासात महापालिकेच्या निधीतून रस्ते, गडरलाईन, पाण्याची लाईन व पथदिवे अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधांची कामे करण्यात आलेली आहेत. गेल्या काही वर्षांत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने डांबरीकरणातील गिट्टी बाहेर पडली असून, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नगरसेवकांनी डांबरी रस्त्यांचे प्रस्ताव सादर केले. परंतु महापालिकेने हस्तांतर करून घेतल्याबाबतचे आधी पत्र द्या त्यानंतरच निधी उपलब्ध होईल, अशी भूमिका बांधकाम विभागाने घेतल्याने स्थायी समितीने तरतूद केली असतानाही मूलभूत सुविधांची कामे रखडलेली आहेत.
पूर्व नागपूर, दक्षिण व उत्तर नागपुरातील शेकडो अभिन्यासातील रस्ते नादुरुस्त आहेत. नागरिक त्रस्त झालेले आहेत. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार नगरसेवकांनी डांबरीकरण, नाल्या व गडरलाईन दुरुस्तीच्या फाईल्स स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रशासनाकडे पाठविल्या आहेत. मात्र आधी हस्तांतरणाचे पत्र सादर करा, त्यानंतरच फाईल मंजूर करू, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
महापालिकेच्या निधीतून तसेच आमदार निधीतून मागील काही वर्षांपूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांची कामे करण्यात आली. आज हे रस्ते नादुरुस्त झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. डांबरीकरण व खड्डे बुजविण्याची गरज आहे. परंतु अधिकाऱ्यांनी हस्तांतरणपत्राची अट घातली आहे. नंदनवन, बुग्गेवार ले-आऊ ट, हुडकेश्वर भागातील गुरुदेवनगर, बांते ले-आऊ ट, श्रीकृष्णनगर, सूर्यनगर, शेषनगर, दिघोरी भागातील वस्त्या, पारडी भागातील नेताजीनगर यासह अनेक वस्त्यांतील फाईल्स रोखल्या आहेत.
आधी विकास कामे कशी केली?
२३३ व १४५ अभिन्यासातील विकास कामांवर गतकाळात महापालिकेच्या तिजोरीतून निधी खर्च करण्यात आला आहे. त्यावेळी हस्तांतरणपत्राची गरज भासली नाही. मग आताच अशा प्रमाणपत्राची मागणी करणे चुकीचे आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. अभिन्यासातील विकास कामातील अनियमिततेवर चर्चा करण्यासाठी १० डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करणार आहे.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका