नागपूर मनपात पदोन्नती घोटाळा; चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 08:22 PM2019-02-26T20:22:07+5:302019-02-26T20:24:30+5:30
महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर नाही. विभागांची सेवाज्येष्ठता यादी नाही. ज्यांच्याकडे पदवी नाही अशांच्या सेवापुस्तिकेत पदवीधारक असल्याबाबतची नोंद करून पदोन्नती देण्याचे प्रकार सुरू आहे. नियम डावलून प्रकार सुरू आहेत. यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप मंगळवारी सर्वसाधारण सभेत क रण्यात आला. यावर अतिरिक्त आयुक्तामार्फत चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर नाही. विभागांची सेवाज्येष्ठता यादी नाही. ज्यांच्याकडे पदवी नाही अशांच्या सेवापुस्तिकेत पदवीधारक असल्याबाबतची नोंद करून पदोन्नती देण्याचे प्रकार सुरू आहे. नियम डावलून प्रकार सुरू आहेत. यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप मंगळवारी सर्वसाधारण सभेत क रण्यात आला. यावर अतिरिक्त आयुक्तामार्फत चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होताच भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनी शिप्ट अभियंता यांना कनिष्ठ अभियंता पदात समायोजित करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. शासनाचे पदोन्नतीचे नियम आहेत. महापालिकेत सभागृहाच्या मंजुरी घेऊ न पदोन्नती देण्याची अनेक प्रकरणे आहेत. मग शिफ्ट अभियंता यांच्यावर अन्याय का, असा सवाल होले यांनी केला. पदोन्नतीत घोटाळा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
उपायुक्त महेश धामेचा यांनी पदोन्नतीची यादी वेबसाईटवर प्रकाशित के ली जात असल्याची माहिती दिली. परंतु यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. पदोन्नतीचा प्रश्न गंभीर असल्याने या प्रकणाची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत करून पुढील सभागृहात याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केली. महापौरांनी त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले तसेच नगरसेवकांना यासंदर्भात सात दिवसात तक्रारी द्याव्यात असे त्यांनी आवाहन केले.
महाराष्ट्रात कोणत्याही महापालिकेत शिफ्ट इंजिनिअरचे पद नाही. मात्र नागपूर महापालिकेत या पदावर भरती घेण्यात आली आहे. अशा आयटीआय उत्तीर्ण असलेल्यांना अभियंता पदावर पदोन्नती देण्याची सूचना नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केली.
अखेर साबळे यांचा राजीनामा
काँग्रेसच्या कोट्यातून तीन नगरसेवक स्थायी समितीवर जातात. त्यानुसार दिनेश यादव व गार्गी चोपडा यांनी निवड करण्यात आली होती. मात्र एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असल्याने हर्षला साबळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यांचे पती मनोज साबळे यांनीही राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु स्थायी समितीवरील नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याने अखेर साबळे यांनी समितीचा राजीनामा दिला. विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौरांकडे त्यांचा राजीनामा सोपविला. त्यांच्या रिक्त जागेवर कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे.
बसपाचे बुर्रेवार यांची वर्णी
बसपाच्या कोट्यातून स्थायी समितीवर एका सदस्यांची नियुक्ती केली जाते. मंगला लांजेवार यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी इब्राहिम टेलर यांची निवड होणार असल्याची कालपर्यंत चर्चा होती. मात्र सभागृहात अचानक संजय बुर्रेवार यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीत बुर्रेवार यांना भाजपाने उमेदवारी न दिल्याने ते बसपाच्या तिकिटावर निवडून आले होते.