नागपूर मनपा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:47 AM2018-03-20T00:47:33+5:302018-03-20T00:47:45+5:30
पुढील शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ जून रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. यासाठी शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सोमवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुढील शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ जून रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. यासाठी शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सोमवारी दिले. यासंदर्भात महापालिका मुख्यालयातील सभागृहात शिक्षण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी मागील वर्षी डी.बी.टी कार्ड तयार करण्यात आलेले होते. यावषीर्ही तीच प्रणाली राबविण्यात यावी. तसेच जे विद्यार्थी नव्याने प्रवेश घेणार आहेत त्यांचे डी.बी.टी. कार्ड तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात यावी. गणवेशाचे आठ-दहा नमुने येत्या चार-पाच दिवसात सादर करण्याचे निर्देश दिलीप दिवे यांनी दिले.
पूर्व माध्यामिक वर्गाच्या इंग्रजी माध्यमाची नर्सरी व केजी वन, केजी टू ची पुस्तके निवड करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. त्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात यावी, असे दिवे यांनी निर्देशित केले.
महापालिका शाळेत बायोमॅट्रिक सिस्टिम लावण्याबाबत मंजुरी मिळली आहे. त्याबाबत निविदा तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करा. सेवाज्येष्ठता यादी तयार क रताना जे शिक्षक निवृत्त झाले आहे त्यांची नावे त्या यादीतून वगळून सुधारित यादी तयार करून प्रकाशित करा, असे आदेश दिवे यांनी दिले. विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक आणि पिण्याच्या पाण्याच्या देयकाबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपसभापती भारती बुंडे, सदस्या रिता मुळे, स्वाती आखतकर, प्रमिला मंथरानी, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, नितीन साठवणे, मनोज गावंडे, मो. इब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अतिरिक्त सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर उपस्थित होते.