नागपूर मनपा झोन सभापती निवडणूक : भाजपची साथ, गार्गी चोपडांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:24 PM2019-06-01T23:24:48+5:302019-06-01T23:30:31+5:30

मंगळवारी व आसीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत भाजपने घेतलेल्या भूमिकेने सर्वांनाच चकित केले आहे. मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसच्या गार्गी चोपडा यांना भाजपच्या नगरसेवकांनी मतदान करीत विजयी केले तर आशीनगर झोनमध्ये भाजपने तटस्थ राहून बसपाच्या विरंका भिवगडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. चोपडा यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे भाजपचा प्रचार केला. त्याचे हे बक्षीस मानले जात आहे. उर्वरित आठही झोनमध्ये सभापतिपदी अविरोध निवड झाली.

Nagpur NMC Zone Chairman election: BJP's supported, development of Gargi Chopada | नागपूर मनपा झोन सभापती निवडणूक : भाजपची साथ, गार्गी चोपडांचा विकास

नागपूर मनपा झोन सभापती निवडणूक : भाजपची साथ, गार्गी चोपडांचा विकास

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी झोनमध्ये भाजप नगरसेवकांकडून मतदानआसीनगर झोनमध्ये बसपासाठी भाजपा तटस्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी व आसीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत भाजपने घेतलेल्या भूमिकेने सर्वांनाच चकित केले आहे. मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसच्या गार्गी चोपडा यांना भाजपच्या नगरसेवकांनी मतदान करीत विजयी केले तर आशीनगर झोनमध्ये भाजपने तटस्थ राहून बसपाच्या विरंका भिवगडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. चोपडा यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे भाजपचा प्रचार केला. त्याचे हे बक्षीस मानले जात आहे. उर्वरित आठही झोनमध्ये सभापतिपदी अविरोध निवड झाली.
नगरसेवक प्रकाश भोयर (लक्ष्मीनगर), अमर बागडे (धरमपेठ), माधुरी ठाकरे (हनुमाननगर), लता काडगाये (धंतोली), समिता चकोले (नेहरूनगर), वंदना यंगटवार (गांधीबाग), अभिरूची राजगिरे (सतरंजीपुरा), राजकुमार साहु (लकडगंज) यांची झोन सभापती म्हणून अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अश्विन मुदगल यांच्यासह मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, निगम सचिव हरीश दुबे, सहायक आयुक्त राजू भिवगडे, महेश मोरोणे, स्मिता काळे, प्रकाश वराडे, हरीश राऊत, गणेश राठोड आदी उपस्थित होते.
मंगळवारी झोन सभापतिपदासाठी काँग्रेसच्या गार्गी चोपरा व बसपाचे नरेंद्र वालदे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. अंतिम वेळेपर्यंत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. माजी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व संदीप जाधव हे काँग्रेसच्या गार्गी चोपडा यांचे सूचक-अनुमोदक बनले. येथे भाजपच्या आठही नगरसेवकांनी चोपडा यांना मतदान केले. काँग्रेस नगरसेवकांनी मतदान केलेच नाही. यामुळे चोपडा यांना ९ तर वालदे यांनी ३ मते मिळाली. बहुमताच्या आधारे गार्गी चोपरा यांना विजयी घोषित करण्यात आले.विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी गार्गी यांचे पती डॉ. प्रशांत चोपडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आसीनगर झोनमध्ये सभापतिपदासाठी भाजपच्या भाग्यश्री कानतोडे यांनी अर्ज भरला. काँग्रेसच्या नेहा निकोसे व संदीप सहारे तर बसपाच्या विरंका भिवगडे यांनी अर्ज भरला. नसीम बानो इब्राहिम खान या कानतोडे यांच्या सूचक व गोपीचंद कुमरे अनुमोदक बनले. दिनेश यादव हे निकोसे यांचे सूचक तर परसराम मानवटकर अनुमोदक होते. संदीप सहारे यांचे सूचक मनोज सांगोळे व अनुमोदक भावना लोणारे होते. बसपाच्या विरंका भिवगडे यांचे सूचक मोहम्मद इब्राहिम तौफीक अहमद व अनुमोदक मंगला लांजेवार होत्या. शेवटच्या क्षणी भाग्यश्री कानतोडे व संदीप सहारे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसच्या निकोसे व बसपाच्या भिवगडे यांच्यात लढत झाली. या झोनमध्ये बसपाचे ७, काँग्रेसचे ६ व भाजपचे ३ नगरसेवक आहेत. मतदानात भाजप तटस्थ राहिली. त्यामुळे बसपाच्या भिवगडे या एका मताने विजयी झाल्या. नवनिर्वाचित सभापतींचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी गार्गी चोपडा देखील उपस्थित होत्या.
काँग्रेस नगरसेवकांमध्ये रोष
गार्गी चोपडा यांना काही दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून स्थायी समितीवर सदस्य म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतरही चोपडा यांनी सभापती होण्यासाठी भाजपाची साथ घेतल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये रोष दिसून आला. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षात ठाण मांडले होते. मात्र, तानाजी वनवे कक्षात नव्हते व नगरसेवकांचे फोनही उचलत नव्हते. चोपडा यांनी लोकसभेत उघडपणे भाजपचा प्रचार केला. याची तक्रार शहर काँग्रेस व विरोधी पक्ष नेत्यांकडे करण्यात आली. मात्र, त्यानंतरही दखल घेण्यात आली नाही, याबाबत काँग्रेस नगरसेवकांमध्ये रोष होता. वनवे यांचे चोपडा यांना छुपे समर्थन आहे का, असा सवालही काँग्रेस नगरसेवकांनी उपस्थित केला.
काम करणाऱ्या नगरसेविकेची साथ दिली : कुकरेजा
गार्गी चोपडा यांचे काम चांगले आहे. त्यामुळे विकास करणाऱ्या नगरसेविकेला भाजपने साथ दिली. यात कुठलेही राजकारण नाही, असे भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी स्पष्ट केले.
जेथे पती, तेथे मी : गार्गी चोपडा
पत्रकारांशी बोलताना गार्गी चोपडा म्हणाल्या, आपण विकासासोबत जाणे पसंत केले. जेथे आपले पती जातील, तेथे आपण जाऊ, असे सांगत उर्वरित प्रश्नांची उत्तर आपले पती देतील, असे सांगितले. डॉ. प्रशांत चोपडा म्हणाले, मी भाजपसोबत आहे. काँग्रेसमध्ये तीनदा नगरसेवक राहूनही काहीच मिळाले नाही. नितीन गडकरी हे विकास पुरुष आहेत. त्यांच्यासाठी गार्गी यांनी निवडणुकीत काम केले. त्यामुळे गार्गी यांनी भाजपला समर्थन मागितले व भाजपकडून मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Nagpur NMC Zone Chairman election: BJP's supported, development of Gargi Chopada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.