नागपूर केवळ प्रशिक्षित पायलटच नाही, वैज्ञानिकही जाऊ शकतील अंतरिक्ष केंद्रात: एस. साेमनाथ
By निशांत वानखेडे | Published: March 21, 2024 08:23 PM2024-03-21T20:23:16+5:302024-03-21T20:23:25+5:30
इस्राे व विज्ञान भारतीच्या ‘स्पेस ऑन व्हील’ चा समाराेप
निशांत वानखेडे, नागपूर : भारत येत्या काही वर्षात अंतराळात अनेक पाऊले उचलणार आहे आणि अंतराळ केंद्र (स्पेस स्टेशन) स्थापन करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत अंतराळात वायुसेनेच्या पूर्ण प्रशिक्षित वैमानिकांनाच अंतराळवीर म्हणून पाठविण्यात येते, मात्र अंतराळ केंद्र झाल्यावर शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वैज्ञानिकांनाही अंतराळात पाठविता येईल, असे मत भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्राे) चे अध्यक्ष डाॅ. एस. साेमनाथ यांनी व्यक्त केले.
इस्राे आणि विज्ञान भारती विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झालेल्या ‘स्पेस ऑन व्हील’ च्या समाराेपीय कार्यक्रमात डाॅ. साेमनाथ उपस्थित हाेते. यावेळी विज्ञान भारतीचे अध्यक्ष व सीएसआयआरचे माजी महासंचालक डाॅ. शेखर मांडे, एनआरएससीचे डाॅ. प्रकाश चव्हाण, सीबीबीडीचे सुधीर कुमार, शिवकुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित हाेते. डाॅ. साेमनाथ यांनी २०२५ मध्ये गगनयान व २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला. २०२८ पर्यंत अंतराळ केंद्र स्थापन करण्यासाठी इस्राेचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतराळ संशाेधनाच्या कार्यात ४५० अब्ज डाॅलरच्या गुंतवणूकीसह अमेरिका क्रमांकावर आहे. सध्या भारताचे याेगदान केवळ २ टक्क्यावर आहे आणि १० टक्क्यावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनव्या कल्पना, स्टार्टअपसह आणि उद्याेग जगतानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. १९६० च्या दशकात अमेरिकेने चंद्र माेहिम राबविली तेव्हा, भारतात राॅकेटही बनत नव्हते पण आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाेहचणारा भारत पहिला देश आहे. भारत विकसित राष्ट्र असून प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करीत आहे. सध्या आपण ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पाेहचेल, असा विश्वाश डाॅ. साेमनाथ यांनी व्यक्त केला.
जग झपाट्याने बदलत आहे. आपण डिजिटल क्रांतीच्या युगात राहताे आणि सर्वाधिक ट्रान्झॅक्शनसह भारत डिजिटल क्रांतीचे नेतृत्व करीत आहे. अंतराळ विज्ञानातही आपल्याला वेगाने पुढे जायचे आहे, कारण अंतराळ विज्ञान हा डिजिटल क्रांतीचा कणा आहे. ज्यांनी तंत्रज्ञानाच्या शक्तिचा प्रभाव ओळखला, भविष्य त्यांचे आहे आणि अंतराळ विज्ञान प्रत्येक क्षेत्रात याेगदान देणारे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेपासून भाैतिक विज्ञान, पदार्थ विज्ञान, वैद्यकीय विज्ञान आणि कृषी क्षेत्रातही अमुलाग्र बदल घडविण्यासाठी अंतराळ विज्ञान संशाेधनाचे महत्त्व राहणार असल्याचे मत डाॅ. साेमनाथ यांनी व्यक्त केले. विदर्भाचे कृषी क्षेत्र आणि ग्रामीण दळणवळणात अंतराळ संशाेधन लाभदायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
५ लाख विद्यार्थ्यांनी पाहिले स्पेस ऑन व्हील
विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल रुची आणि अंतराळ संशाेधनाबद्दल जागृतीसाठी इस्राे व विभाच्या पुढाकाराने चंद्रयान व भारतीय अंतराळ माेहिमांची माहिती देण्यासाठी फिरती बस तयार करण्यात आली हाेती. ही बस विदर्भाच्या ११ जिल्ह्यात ५००० किमीचा प्रवास करीत १३५ पेक्षा जास्त शाळांपर्यंत पाेहचली आणि ५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. अंतराळ बस तयार करण्यामागे परिश्रम करणारे सुधीर कुमार यांनी या यशाची ग्वाही दिली. यावेळी अचलपूरचा विद्यार्थी साैरभ वैद्य, हिंगणघाटचे शिक्षक आशिष कुमार आणि मेळघाट परिसरातील शिक्षिका विद्या कुमरेकर यांनी भावना व्यक्त केल्या.