कचरा संकलन करारावर नागपूर मनपात साधी चर्चाही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 08:15 PM2020-01-20T20:15:42+5:302020-01-20T20:26:12+5:30
प्रभागात कचरागाडी येत नाही, कमी आकाराच्या गाड्या आहेत. कनकच्या कर्मचाऱ्यांना का समावून घेतले नाही, अशा स्वरूपाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधकांनी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे सोडून प्रभागातील समस्या मांडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्यापूर्वी शहरातील कचरा संकलनासाठी दोन नवीन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत करण्यात आलेल्या कराराची प्रत सोमवारी मनपा सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित हा मुद्दा असल्याने यावर चर्चा करण्याची सूचना करून यात अधिक पारदर्शता आणण्याची नगरसेवकांना संधी होती. परंतु कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी यावर चर्चा केली नाही. प्रभागात कचरागाडी येत नाही, कमी आकाराच्या गाड्या आहेत. कनकच्या कर्मचाऱ्यांना का समावून घेतले नाही, अशा स्वरूपाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधकांनी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे सोडून प्रभागातील समस्या मांडल्या.
वास्तविक महापौर संदीप जोशी यांनी मागील सभेत कचरा संकलन करारात काही सुधारणा वा सूचना पुढील सभागृहात सादर करण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी कचरा संकलन करारासंदर्भात मागील दोन सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. सोमवारी ते कामामुळे सभागृहात हजर नव्हते. अशावेळी विरोधी पक्षनेते वा काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत चर्चा करून आवश्यक सूचना देणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही घडले नाही.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कनकच्या कर्मचाऱ्यांना नवीन कंपन्यांनी सामावून घेतले नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. कचरा संकलनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ए.जी. एन्व्हायरो व बीवीजी इंडिया कंपन्यांचे काम समाधानकारक नाही. प्रभागात नियमित गाड्या येत नाहीत. कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचे वनवे यांनी सांगितले. तर स्लम भागात साफसफाई होत नसल्याचे काँग्रेसचे जुल्फेकार भुट्टो यांनी निदर्शनास आणले.
लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर यांनी कचरा संकलनासाठी एका प्रभागात आठ गाड्या उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा मांडला. माजी महापौर प्रवीण दटके यांनी करारानुसार कचरा संकलनाचे काम होते की नाही, याची माहिती प्रत्येक महिन्याला सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची सूचना केली.
पक्ष बैठकीत चर्चा, करार योग्यच
कचरा संकलन कंपनी ए.जी. एन्व्हायरो व बीवीजी इंडिया व महापालिका प्रशासन यांच्यातील करारावर सदस्यांनी चर्चा केली नाही. सभागृहाचे कामकाज संपल्यावर सत्ता पक्षनेते संदीप जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले, यावर विरोधकांनीच चर्चा केली नाही. भाजपच्या पक्ष बैठकीत यावर चर्चा करण्यात आली होती. करारातील शर्ती व अटी समाधानकारक आहेत. सत्तापक्षाचे १०८ सदस्य समाधानी आहेत का, अशी विचारणा करता ते समाधानी होते म्हणूनच चर्चेत सहभागी नव्हते, असे जाधव म्हणाले.
कंपन्यांचे काम समाधानकारक नाही
शहरातील कचरा संकलनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन्ही कंपन्यांचे काम समाधानकारक नाही. सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याचे सकारात्मक परिणाम येतील. आजवर दोन्ही कंपन्यांवर सात लाखांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.
३.५ एकर जागा कचरामुक्त
भांडेवाडी येथील ३८ एकर जागेत कचरा साठविण्यात आला आहे. बायोमायनिंग प्रक्रियेच्या माध्यमातून ३.५ एकर जागा कचरामुक्त करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात संपूर्ण भांडेवाडी कचरामुक्त होणार आहे. कचरा प्रक्रिया निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याचा विचार करता कचरा प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या नियुक्त करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.