नागपुरात कुख्यात सहारेने स्वत:च केला गोळीबार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:08 PM2018-01-22T22:08:18+5:302018-01-22T22:10:10+5:30
प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना अडकविण्यासाठी आणि स्वत:ची मानगूट गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय ३०) आणि त्याच्या भावाने स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. प्रत्यक्षात गोळीबार सहारेवर झालाच नाही. उलट सहारेनेच त्याच्या विरोधी टोळीतील मयूर गुरुदेव मुरार (वय १७) नामक युवकावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केले होते, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना अडकविण्यासाठी आणि स्वत:ची मानगूट गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय ३०) आणि त्याच्या भावाने स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. प्रत्यक्षात गोळीबार सहारेवर झालाच नाही. उलट सहारेनेच त्याच्या विरोधी टोळीतील मयूर गुरुदेव मुरार (वय १७) नामक युवकावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केले होते, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. जखमी मयूरने पोलिसांकडे तक्रार दिल्याने या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. त्यावरून पोलिसांनी भारत सहारे, त्याचा भाऊ सचिन (वय ३२) आणि सतीश (वय ३३) तसेच त्यांचा साथीदार राहुल गणेश कुडसुले या चौघांना अटक केली. या नाट्यमय घटनाक्रमाची माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
२० जानेवारीच्या पहाटे १.३० च्या सुमारास आठ ते नऊ स्कार्फ बांधलेले आरोपी आमच्या घरावर चालून आले आणि त्यांनी स्वीफ्ट कारची मागची काच फोडली. त्यांच्याकडे मी आणि माझ्या साथीदारांनी धाव घेतली असता आरोपींनी आमच्या दिशेने हवेत गोळीबार करून पळ काढला, अशी माहिती भारत सहारे याने वाडी पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षात फोनवरून दिली होती. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तेथे दोन रिकामी आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, जिवंत काडतुसांची बाब पोलिसांना खटकत होती. आरोपी जिवंत काडतुसे कशाला घटनास्थळी टाकून देतील, असा पोलिसांना प्रश्न होता. त्याआधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली.
चौकशीत समजली भलतीच माहिती
१६ जानेवारीला मयूर मुरार (रा. दिघोरी) आणि आकाश दिनेश राऊत हे दोघे कुख्यात सहारेच्या घराजवळ राहणारा त्यांचा मित्र बादल रामटेके याला भेटण्यासाठी गेले होते. तेथे सहारेच्या गटातील गुंडांसोबत वाद झाल्याने आरोपींनी मयूर आणि आकाशला बेदम मारहाण केली. त्याचा बदला घेण्यासाठी मयूर, आकाश, निकेश कमलेश ठाकरे (दोघेही रा. खरबी, नंदनवन) आपल्या पाच अल्पवयीन साथीदारांसह २० जानेवारीच्या पहाटे कुख्यात सहारेच्या घरावर हल्ला करण्यासाठी पोहचले. भारत सहारे, त्याचे दोन भाऊ आणि साथीदार यावेळी संदीप क्षीरसागर नावाच्या साथीदाराची बर्थ डे पार्टी करीत होते. घरातील सीसीटीव्हीत त्यांना ८ ते ९ स्कार्फ बांधलेले तरुण कारची तोडफोड करताना दिसताच कुख्यात सहारे आणि त्याचे साथीदार घरातील पिस्तूल घेऊन त्यांच्याकडे धावले. सहारेने केलेल्या गोळीबारात एक गोळी मयूरच्या पोटरीतून आरपार केली. त्यामुळे तो जबर जखमी झाला. ते पाहून तो आणि त्याचे मित्र घाबरले आणि पळून गेले. मयूरने एका डॉक्टरकडे उपचार घेतले. ही माहिती पोलिसांना कळली. त्यावरून पोलिसांनी मयूरचा पत्ता शोधला अन् तो सापडताच गोळीबाराचा उलगडा झाला.
पोलिसांच्या उपस्थितीतच टाकली काडतुसे
मयूरवर गोळी झाडणाऱ्या कुख्यात सहारेला या गंभीर गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ शकते, याची कल्पना होती. त्यामुळे त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचले. त्यानुसार, स्वत:वर हल्ला आणि गोळीबार झाल्याचा कांगावा करून त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर गोळीबार कुणी केला त्याची चौकशी करण्यासाठी सहारेच्या घराची झडती घेतली तेव्हा त्याच्या घरातून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. ती जप्त करून पोलिसांनी भारत, सचिन आणि सतीश सहारे, राहुल कडसुले आणि जीवन दिलीप मोहिते या पाच गुंडांना अटक केली. ते पोलीस कोठडीत असून, त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात असल्याचेही सहआयुक्त बोडखे यांनी सांगितले.
हा एकच गुन्हा नाही या गुन्ह्यासोबत आणखी दोन गुन्हे सहारे आणि त्याच्या साथीदारांवर दाखल करण्यात आले. तर, सहारेच्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या आकाश राऊत, निकेश ठाकरे आणि त्यांच्या पाच विधिसंघर्षग्रस्त साथीदारांवरही सहारेच्या तक्रारीवरून गैर कायद्याची मंडळी जमवून हल्ला करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, प्रशांत चौगुले, संजय चव्हाण, सहायक उपनिरीक्षक राजकुमार देशमुख, अविनाश तायडे, हवालदार सुनील चौधरी, अफसर खान, रमेश उमाटे, नरेश रेवतकर, सुरेश ठाकूर, नरेश सहारे, राजेंद्र सेंगर, देवीप्रसाद दुबे, नायक राजेश ठेंगुरीया, रवींद्र बारई, राहुल इंगोले, मंगेश मडावी, आशिष देवरे आणि नीलेश वाडेकर यांनी ही कामगिरी बजावली.