नागपुरात मालमत्तांची संख्या वाढली पण वसुली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:59 PM2018-10-23T23:59:04+5:302018-10-23T23:59:55+5:30
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहरातील मालमत्तांचे सायबरटेक कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील मालमत्तांची संख्या ६.५० लाखापर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कर व कर आकारणी विभागाच्या नोंदीनुसार अजूनही ५.६७ लाख मालमत्तांवर कर आकारणी केली जात आहे. सर्वेक्षणात मालमत्तांची संख्या वाढली पण जुन्याच मालमत्तावर कर आकारणी होत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कर वसुलीत फारशी वाढ झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहरातील मालमत्तांचे सायबरटेक कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील मालमत्तांची संख्या ६.५० लाखापर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कर व कर आकारणी विभागाच्या नोंदीनुसार अजूनही ५.६७ लाख मालमत्तांवर कर आकारणी केली जात आहे. सर्वेक्षणात मालमत्तांची संख्या वाढली पण जुन्याच मालमत्तावर कर आकारणी होत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कर वसुलीत फारशी वाढ झालेली नाही.
सर्वेक्षणामुळे मालमत्तांची संख्या वाढणार असल्याचे गृहित धरून वित्त वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापासून ५०९ कोटींचे उत्पन्न गृहित धरण्यात आले होते. परंतु १ एप्रिल ते २२ आॅक्टोबर २०१८ या साडेसहा महिन्यात विभागाची वसुली जेमतेम ९३ कोटी ३३लाख ३ हजार ९५५ इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७८ कोटी ३९ लाख ६१ हजार १५९ इतकी झाली होती. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा जेमतेम १४.५० कोटींनी वाढ झाली आहे.
वसुलीत धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, आशीनगर व सतरंजुपीरा असे पाच झोन माघारले आहेत. त्या तुलनेत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, लकडगंज व मंगळवारी झोनची वसुली अधिक आहे. लक्ष्मीनगर झोनची सर्वाधिक १४.८८ कोटींची वसुली असून त्यापाठोपाठ धरमपेठ झोनची १२.४२ कोटी तर लकडगंज व मंगळवारी झोनची वसुली ११ कोटीहून अधिक आहे. हनुमाननगर झोनची वसुली १०.४५ कोटी आहे.
सतरंजीपुरा झोन वसुलीत माघारला आहे. या झोनची वसुली फक्त ३ कोटी २० लाख इतकी आहे. गांधीबाग झोन ४.४६, नेहरुनगर ७.६१, तर धंतोली झोनची वसुली ५.८७ कोटी आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी मालमत्ता कराची वसुली केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाकडून वसुलीवर लक्ष केंद्रित केल्याचा दावा केला जात असूनही असतानाही अपेक्षित वसुली होत नसल्याचे चित्र आहे.
नवीन मालमत्ता कुठे गेल्या?
सर्वेक्षणात लाखाहून अधिक नवीन मालमत्तांचा शोध घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मालमत्तांची संख्या वाढल्याने वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र नवीन मालमत्ता अद्याप कर व कर आकारणी विभागाच्या रेकॉर्डला आलेल्या नाहीत. परिणामी, त्यांना अद्याप डिमांड न पाठविल्याने या मालमत्ता कुठे गेल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.