CoronaVirus in Nagpur : नागपुरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 10:57 PM2020-09-07T22:57:22+5:302020-09-07T22:58:44+5:30
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सोमवारी १,५५० नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची संख्या ४१,०३२वर पोहचली. उपचारादरम्यान ५० रुग्णांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सोमवारी १,५५० नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची संख्या ४१,०३२वर पोहचली. उपचारादरम्यान ५० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १,३६५ झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १,२५०, ग्रामीणमधील २९४ तर जिल्ह्याबाहेरील सहा आहेत. आज १,३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.
नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. मेडिकलमध्ये ऑक्सिजन पाईपलाईनचे काम चौथ्या दिवशीही सुरू होते. यामुळे भरतीसाठी आलेल्या व आॅक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना मेयोमध्ये पाठविले जात होते. रात्री ८ वाजेपर्यंत मेयोमधील कोविडच्या सर्व खाटा फुल्ल झाल्या होत्या. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये व शालिनीताई मेघे हॉस्पिटल या दोनच ठिकाणी मोजक्या खाटा उपलब्ध होत्या. यावरून नागपुरातील भीषण स्थितीचा अंदाज येतो. खासगी हॉस्पिटलमध्ये खाटा मिळविण्यासाठी मनपाच्या हेल्प लाईननंबरवर रोज शेकडो फोन येत असल्याचे, अनेकांना खाट मिळत नसल्याचे येथील एका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
अॅन्टिजन चाचणीत ६५३ रुग्ण पॉझिटिव्ह
मनपाच्या झोननिहाय रॅपिड अॅन्टिजन चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. सोमवारी १,९९३ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ६५३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३,३८१ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या, यात १,१९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेतून पाच, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४४, मेयोच्या प्रयोगशाळेतून ३७१, माफसूच्या प्रयोगशाळेतून ७४ तर खासगी लॅबमधून ३३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज शहरात एकूण ५,३७४ चाचण्या झाल्या. यात ३,८२४ रुग्ण निगेटिव्ह आले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून चाचण्यांची संख्या घसरल्याचे दिसून येत आहे.
शहरात ३७, ग्रामीणमध्ये सात मृत्यू
जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीणमध्ये मृत्यूचे सत्र सुरू आहे. आज शहरात ३७, ग्रामीणमध्ये सात तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंत शहरात १०४९, ग्रामीणमध्ये १९२ तर जिल्ह्याबाहेरील १२४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. दिलासादायक म्हणजे, २८,६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून याचे प्रमाण ६९.८४ टक्के आहे. सध्या ११,००९ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात शहरातील ७,३४२ तर ग्रामीणमधील ३,६६७ रुग्ण आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ५,३७४
बाधित रुग्ण : ४१,०३२
बरे झालेले : २८,६५८
उपचार घेत असलेले रुग्ण : ११,००९
मृत्यू :१,३६५