नागपुरात रात्रभरात वाढले ६८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 07:57 PM2020-07-23T19:57:31+5:302020-07-23T20:24:31+5:30
बुधवारी दिवसभरात १२२ रुग्ण व तीन मृतांची नोंद झाली असताना रात्री अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ रुग्णांची भर पडली. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात (मेयो) आणखी एका कोविडबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मृतांची संख्या ६४ तर रुग्णांची एकूण संख्या ३,३६१ वर पोहचली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी दिवसभरात १२२ रुग्ण व तीन मृतांची नोंद झाली असताना रात्री अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ रुग्णांची भर पडली. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात (मेयो) आणखी एका कोविडबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मृतांची संख्या ६४ तर रुग्णांची एकूण संख्या ३,३६१ वर पोहचली होती.
नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. ३० जूनपर्यंत रुग्णांची संख्या १५०५ तर मृतांची संख्या २५ होती. जुलै महिन्याच्या २३ तारखेच्या दुपारपर्यंत १,८५६ रुग्णांची वाढ झाली. शिवाय, ३९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. चार महिन्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या २३ दिवसांत दुपटीने रुग्ण व मृत्यूची संख्या वाढली आहे.
एम्सच्या प्रयोगशाळेत बुधवारी सुमारे २००वर नमुने तपासण्यात आले. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील १० रुग्ण बुद्धविहार दाभा परिसर, सात रुग्ण जरीपटका, १२ रुग्ण पिपरी कन्हान, चार रुग्ण वर्धमाननगर, तीन रुग्ण स्वातंत्र्यनगर नंदनवन, एक रुग्ण निर्मल नगरी, पाच रुग्ण गोपाल पांजरी शंकरपूर व सहा रुग्ण शांतीनगर येथील आहेत. उर्वरित २० रुग्ण इतर भागातील असून त्यांची माहिती उपलब्ध झाली नव्हती.
पुन्हा कामठी येथील रुग्णाचा मृत्यू
मेयोच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६६वर्षीय रुग्णाचा बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. या मृत्यूची नोंद गुरुवारी घेण्यात आली. कामठी येथील रहिवासी असलेला हा रुग्ण १६ जुलै रोजी मेयोत दाखल झाला होता. रुग्णाला उच्च रक्तदाब, टाईप टू मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार व न्युमोनियाचा आजार होता. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत कामठीमधील हा तिसरा मृत्यू आहे.
कोरोनाची आजची स्थिती
(सायंकाळी ४ वाजेपर्यंत)
पॉझिटिव्ह रुग्ण : ६८
मृत्यू : १
रुग्णांची संख्या :३,३४३
मृतांची संख्या : ६४
बरे झालेले बाधित रुग्ण : २,११३
उपचार घेत असलेले रुग्ण : १,११९