नागपुरात प्रभु रामाच्या रथ मार्गावर अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:45 PM2018-03-20T22:45:35+5:302018-03-20T22:45:48+5:30
राम जन्मोत्सवाच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरातून प्रभू रामाची शोभायात्रा निघते. या शोभायात्रेची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शोभायात्रा जाणाऱ्या मार्गांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी रस्ता बंद आहे तर कुठे मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राम जन्मोत्सवाच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरातून प्रभू रामाची शोभायात्रा निघते. या शोभायात्रेची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शोभायात्रा जाणाऱ्या मार्गांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी रस्ता बंद आहे तर कुठे मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.
नागपूरची ही शोभायात्रा देशात प्रसिद्ध आहे. ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शोभायात्रेच्या मार्गात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी यात्रेच्या मार्गात नादुरुस्त रस्त्यांच्या अडथळा आहे. असे असले तरी प्रशासनाने मौन धारण केले आहे. ‘लोकमत’ने शोभायात्रेच्या मार्गाची पाहणी केली असता अनेक अडथळे दिसून आले. पोद्दारेश्वर श्री राम मंदिराच्या समोरील रस्ता अद्यापही पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेला नाही. मेयो हॉस्पिटल चौकात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. ज्या जागेवरून शोभायात्रा जुन्या भंडारा रोडकडे वळते ती जागा बंद करण्यात आली आहे. मेयोच्या प्रवेशद्वारासमोर काही जागा मोकळी आहे. तेथून शोभायात्रा काढताना बऱ्याच अडचणी येतील.
आग्याराम देवी चौकाची पूर्णपणे दूरवस्था झाली आहेय येथील रस्त्यावर डांबरीकरणही करण्यात आलेले नाही. कॉटन मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजुचे सिमेंटकरणाचे काम बंद पडले आहे. कॉटन मार्केट चौकातही अशीच स्थिती आहे. येथेही मेट्रोच्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. आनंद टॉकीज चौकात मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे येथे आधीच वाहतुकीची कोंडी होते. मुंजे चौकात तर याहूनही वाईट चित्र आहे. येथेही बांधकामासाठी रस्ता अरुंद करण्यात आला आहे. या मार्गावरून शोभायात्रा काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.