Nagpur: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: July 26, 2024 09:14 PM2024-07-26T21:14:20+5:302024-07-26T22:04:31+5:30
Nagpur News: ‘एक्स’वर (अगोदरचे ट्वीटर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- योगेश पांडे
नागपूर - ‘एक्स’वर (अगोदरचे ट्वीटर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित खात्यावरून फडणवीस व भाजपच्या नेत्यांच्या फोटोंना मॉर्फ करून चुकीचे नॅरेटीव्ह पसरविण्याचा प्रयत्न सुरू होता.
‘एक्स’वर गजाभाऊ नावाने संबंधित खाते सुरू आहे. या खात्यावर देवेंद्र फडणवीस यांचे फोटो मॉर्फ करत कधी मुघल तर कधी तांत्रिक दाखविण्यात आले आहे. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आले आहेत. यासंदर्भात नागपुरातील वकील परिक्षित गजानन मोहिते यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. संबंधित पोस्ट या अतिशय खालच्या पातळीच्या असून त्या माध्यमातून समाजात भ्रम पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक व सामाजिक मुद्द्यांबाबत संभ्रमित करणाऱ्या पोस्ट टाकून संंबंधित खातेधारकाने राज्यातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची शहानिशा करून सिताबर्डी पोलीस ठाण्यात संबंधित खातेधारकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५३ (१)(सी), ३३६(४) व ३५८(२)(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधानांचेदेखील मॉर्फ फोटो
संबंधित खातेधारकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोदेखील मॉर्फ करून पोस्ट केले आहेत. एका चित्रपट अभिनेत्याच्या चेहऱ्याऐवजी पंतप्रधानांचा फोटो लावण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गुन्हा दाखल झाल्यावरदेखील शुक्रवारी उशीरापर्यंत संबंधित एक्स खाते सक्रिय होते. त्यातील एकही पोस्ट डिलिट झालेली नव्हती.